दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील व्यापाऱ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना मानसिक रुग्ण असलेल्या महिलेकडून वारंवार त्रास होत होता. प्रसंगी काही वस्तू हिसकावून घेताना वाद-विवाद होत होते मात्र या वेडसर मनोरुग्ण महिलेला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून आधार मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, एक वेडसर मनोरुग्ण महिला गेली सहा महिन्यांच्या कालावधीपासून दौंड व कुरकुंभ परिसरातील रस्त्यांवर इकडे-तिकडे भटकत होती. काही मिळेल ते खात होती. कधीकधी अनेक वस्तू व खाद्यपदार्थ हिसकावून घेताना नागरिक व्यापारी व या महिलेत झटापट होत होती.
या महिलेकडून जास्त त्रास इथल्या व्यापारी वर्गाला आणि रोज शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत होता. ही महिला सतत शिवीगाळ व त्रास देत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना केली. त्यानंतर यादव यांनी तात्काळ अहमदनगरच्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानव सेवा प्रकल्प आरणगाव यांना संपर्क साधून महिलेबाबत माहिती देत व्यवस्था केली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दौंड पोलीस ठाण्याचे रवींद्र काळे, योगेश पाटील, महिला पोलिस असीम शेख व पल्लवी महाडिक यांच्या मदतीने महिलेस मोठी कसरत करून ताब्यात घेतले आणि मानव सेवा प्रकल्प ग्रामविकास मंडळ येथे पाठवून संबंधित महिलेला संस्थेच्या ताब्यात दिले.
आता या महिलेला या संस्थेचा आधार मिळाला असून तिच्या स्वच्छतेची, राहण्याची, खाण्याची सोय होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी बोलताना दिली. मनोरुग्ण महिलेचा त्रासही बंद झाला आणि तिच्या राहण्या,खाण्याची व्यवस्था झाल्याने इथल्या व्यापारी वर्गाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व दौंड पोलिसांचे आभार मानले.
दिलीप गुंजाळ यांच्या मानव सेवा प्रकल्पात अशा निराधार बेवारस नागरिकांवर औषधोउपचार आणि मानसिक उपचार करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले जाते. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस ठाण्याचे रवींद्र काळे, योगेश पाटील,संजय कोठावळे, महिला पोलिस असीम शेख व पल्लवी महाडिक यांनी केली.











