शुक्रवारी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांची मानसिक तयारी करणार?
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपाने आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.1) कळस-वालचंदनगर गटाचा जंक्शन येथे 4 वाजता, तर निमगाव-निमसाखर गटाचा निमगाव केतकी येथे सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भाजपने इंदापूर तालुक्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. यंदा विधानसभा जिंकायचीच असा संकेत देत रणनीती आखली आहे व कार्यकर्त्यांना तयारीला लावले आहे. यंदा लोकसभेला अजित पवारांना सहकार्य करण्यावर काय भुमिका घ्यायची यावरही हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांचा कल जाणून घेणार आहेत.
संकल्प 2024 संकल्प विजयाचा या अभियानांतर्गत जंक्शनचा मेळावा रोहित मंगल कार्यालयात, तर निमगाव केतकीचा मेळावा संत सावता माळी मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या मेळाव्यांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अन्य भाजप नेते मार्गदर्शन करणार आहेत.











