विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार आहेत. बारामती तालुका कुस्तीगार संघाचेही ते काम पाहतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये मेळाव्यामध्ये आपले कुटुंब एकटे पडले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीची चर्चा संपूर्ण राज्यात झाली.
या कार्यालयाला युगेंद्र पवार यांनी भेट दिल्यानंतर शरद पवार म्हणाले, युगेंद्र व्यावसायिक आहेत. युगेंद्र अमेरिकेत शिकून आले असून राजकारणात नसतात. युगेंद्र तुमच्याबरोबर आले तर स्वागत होईल का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले कुणी एखादी भूमिका घेतली, तर त्याबद्दल वेगळं मत व्यक्त करण्याचं कारण नाही. कुठेही काम करण्याचा त्यांना अधिकार आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, युगेंद्र हा हुशार मुलगा आहे. तो अमेरिकेतून शिकून आलेला आहे. सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसायही उत्तम करतो आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल त्याच्यात गैर काय? माझा जर तो प्रचार करणार असेल, तर मला मनापासून आनंद होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रोहित पवार म्हणले, तो तिथे जाऊन जर साहेबांना या वयामध्ये सहकार्य करत असेल, तर ती एक चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागत आपण सर्वांनी केले पाहिजे. युगेंद्र पवार हे या वयामध्ये साहेबांची साथ देतात हे स्वागत करण्यासारखेच आहे असे रोहित पवार म्हणाले.











