विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उभे राहणार याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज बारामती मध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारा चित्ररथ आज सकाळपासून बारामतीमध्ये फिरू लागला आहे.
अर्थात त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष होण्याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध मेळाव्यांच्या निमित्ताने बारामतीत असून खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार हे देखील बारामती मध्ये आहेत. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती देणारा हा रथ फिरू लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांना सुरुवात केली असून ते विविध गावांना भेटी देत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली होती.











