विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बूथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली होती. यावेळी पवार यांनी बोलताना पक्षात मध्यंतरी नेमकं काय घडलं हे सांगताना अजित पवारांना गहिवरून आले.
त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठ म्हणजे शरद पवार आणि दुसरे वरिष्ठ म्हणजे प्रतापराव पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मी आणि माझा फक्त परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे. मी यांच्या पोटी जन्माला आलो नाही हा काय माझा दोष झाला का? मी सख्ख्या भावाचा मुलगा आहे ना? असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले.
अजित पवार असे म्हणताच कार्यकर्ते उठले. कार्यकर्ते देखील गहिवरले आणि त्यांनी आत्ताच उमेदवाराचे नाव जाहीर करा, आम्ही त्यांना निवडून आणल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही काळ अजित पवारांना शब्द सुचले नाहीत.
अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही. पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे अशा स्वरूपाची टीका देखील अजित पवार यांनी केली.











