विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलक लक्ष्मण गुणवरे पाटील यांचे तहसील व पंचायत समितीच्या दारात घातला दंडवत.. केले घंटानाद आंदोलन..! अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चर्चा!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रलंबित प्रश्नाच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरीक घंटानाद आंदोलन कर्ते लक्ष्मण गुणवरे पाटील यांनी तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर दंडवत घालत, घंटानाद करत आपल्या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला..
गुणवरे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर, पोंदकुलवाडी, बोरी, अगोती नं-१, अंथुर्णे, डाळज नं-१ येथील नागरिकांना रुग्णसेवेसाठी अडचण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कामकाज तात्काळ सुरू करण्यात यावे.
तसेच अनेक दिवसांपासून तालुक्यातील अगोती नं-१ ते चांडगाव एस.टी च्या बंद असाणाऱ्या तीन फेऱ्या चालु कराव्यात. अगोती नं-१ येथील स्ट्रीट लाईट कधीही चालू व कधीही बंद अशा अवस्थेत आहे. स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करावी, अशा मागण्या गुणवरे पाटील यांनी मांडल्या आहेत.
विविध मागण्यांची प्रशासनाकडून दखल न घेतल्याने गुणवरे पाटील यांनी अनोख्या आंदोलनाचे हत्यार उपसत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोरच दंडवत घालत घंटानाद आंदोलन केले.
प्रशासनाला सुबुद्धी मिळावी म्हणून केलेल्या या आगळ्यावेगळ्या दंडवत घंटानाद आंदोलनाची इंदापूर तालुक्यात चर्चा रंगली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र व यापेक्षा वेगळे आंदोलन अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या दारात करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.











