शिरूर : महान्यूज लाईव्ह
सकाळची दहाची वेळ…गावच्या मुख्य चौकात नागरिकांची वर्दळ…इतक्यात पेटलेला सिलेंडर… आग विझविण्याचा प्रयत्न…जवळ गॅस सिलेंडर टाक्या…त्यामुळे प्रचंड धाकधूक वाढलेली..इतक्यात गावचे सरपंच अन् नागरिक धावतात…अन् आगीवर नियंत्रण मिळवले जाते अन् क्षणात आलेले मोठे विघ्न टळले जाते…अत्यंत अंगाचा थरकाप उडवणारा क्षण सकाळी पाहायला मिळाला करडे (ता. शिरूर) या गावात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,करडे (ता. शिरूर) येथे मुख्य चौकात असणाऱ्या गॅस एजन्सी दुकानात आज सकाळी मंगळवार (दि.६) रोजी गॅसची छोटी टाकी अचानक पेट घेतला होता. यावेळी सदर दुकानात असणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ दुकानातून टाकी बाहेर आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळ रस्ता असल्याने मोठी वाहनांची वर्दळ होती. मुख्य चौकात नागरिक देखील उपस्थित होते.
टाकी पेटली असल्याने सारे घाबरले होते. स्थानिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आग आटोक्यात येत नव्हती. शेजारी इतर गॅस टाक्या काही अंतरावर असल्याने संभाव्य मोठा धोका तिथे होता. तसेच पेटलेल्या टाकीचा देखील धोका होता. मात्र अशात गावचे सरपंच सुनील इसवे, संजय जगदाळे यांनी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
जवळच असलेल्या वाहनातून आग विझविण्यासाठी असणारे फायर टँक बॉटल तत्काळ आणून काही अंतरावर पेटती टाकी उभी करून आग विझविण्यात यश मिळवले. या दाखविलेल्या धाडसाने व तत्परतेने मोठा धोका टळला.
याविषयी अधिक माहिती देताना सरपंच सुनील इसवे यांनी सांगितले की, कंपन्यामध्ये काम करत असताना आग कशी विझवायची याबाबत माहिती होते. त्यामुळे प्रसंगावधान राखून आणलेल्या आग प्रतिबंधक टाकीमुळे मोठा अनर्थ टाळता आला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी संजय जगदाळे, मधुकर घायातडक, बाळासाहेब वाळके, मधुकर बांदल, राहुल पळसकर, मच्छिंद्र गोरे यांनी परिश्रम घेतले. सकाळची नागरिकांची गर्दी, रस्त्यावर प्रचंड वाहने व त्यात पेटलेली गॅसची टाकीची आग विझविल्याने सुनील इसवे व संजय जगदाळे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.











