दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
व्याजवाडी बावधन शिवेवर उजव्या कालव्याला भगदाड पडले आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान याप्रकरणी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांची घटनास्थळाला भेट देऊन तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.
धोम धरण व्यवस्थापनाचे गलथान कारभारामुळे उजवे आणि डावे या दोन्हीही कालव्यांना सतत भगदाडे पडत आहेत. धरणातील लाखो लिटर पाणी वाया जाते. आधीच धोम धरणाचा व्यवसाय आतबट्ट्याचा आहे, त्यात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पाण्याची पैशाची वसुली अधिकाऱ्यांच्या पगारातून करावी अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना समजताच त्यांनी व्याजवाडी आणि बावधन गावच्या शिवेवर जाऊन उजव्या कालव्याला पडलेल्या भगदाडच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व तातडीने दुरुस्तीच्या सुचना दिल्या.
पण विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळावर ना धरण व्यवस्थापनाचे उपअभियंता उपस्थित नव्हते ना तांत्रिकदृष्ट्या काम करणारे कोणीही अधिकारी! विशेष म्हणजे इथला अधिकारी हा चित्रकार पदावर काम करतो आणि त्याला मात्र अभियंत्याचा प्रभारी अधिकार दिला असल्याचे बोलले जाते. तो लोकांशी अत्यंत उर्मटपणे वागतो अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.
चित्रकार पदावरच्या कामगाराला तांत्रिक अधिकार नसताना एवढा मोठा कालव्याच्या व्यवस्थापनाचा अधिकार कसा दिला? हा अधिकार देण्याचा प्रताप कोणी केला? असा सवाल उपस्थित केला जात असून शेतकरी मात्र संतप्त आहेत.











