दौंड, महान्यूज लाईव्ह
घराचा दरवाजा तोडून रात्री मोबाईल आणि रोकड, पाकीटे आदींसह इतर मौल्यवान वस्तूंची मारहाण करून बळजबरीने घेऊन जाणाऱ्या एका सराईत टोळीतील आरोपीला दौंड पोलिसांनी बेड्या ठोकुन ताब्यात घेतले आहे. अजय प्रकाश राठोड (रा.गिरीम ता. दौंड) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, मंगळवारी ( दि.६) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ एमआयडीसीमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपल्या राहते घरी झोपले असताना पाच व्यक्तींनी येऊन दरवाजाला धडका देऊन घरात जाऊन दोन मोबाईल, सहा हजार रोकड व पाकिटे असा ५६ हजारांचा माल मारहाण करून जबरीने घेऊन गेल्याची घटना घडली.
याबाबत आशिष रमेश प्रजापती यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीसांना तपासाबाबत सूचना दिल्या. गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हातील एक आरोपी अजय प्रकाश राठोड (रा. गिरिम) दौंड पोलीसांनी शिताफीने गिरीम गावच्या हद्दीमध्ये ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता गुन्ह्यात चोरून नेलेल्या वस्तू त्यामध्ये २० हजार रू. किंमतीचा आयफोन मोबाईल मिळून आला असून इतर फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध दौंड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस शिपाई अमोल देवकाते आदींनी केली.











