सदानंद करंदीकर, बारामती
परवा एका लग्नासाठी भवानीनगरला (ता. इंदापूर) जाण्याकरता बारामती बसस्थानकावर आलो,तर एक बारामती – इंदापूर बस लागलेली दिसली. बसमधे वाहकही (कंडक्टर) बसलेला होता. आज नशिब जोरावर होतं तर. बसपाशी पोचताच वाहकानेच मला आवाज दिला. म्हणाला, चला सर यायचंय का भवानीनगरला? अरेवा. तो ज्याअर्थी सर म्हणाला, म्हणजे तो माझा विद्यार्थी असावा किंवा तो सर म्हणून मला ओळखत असावा. ..
काही असो. मी गाडीत चढलो; तर त्याने मला त्याच्या शेजारीच बसण्याची विनंती केली. बसा सर.जाऊ बोलत. असं म्हणून त्यानेच मला माझ्या मनाला हलवून सोडणारा प्रश्न केला. सर सध्या आकाशवाणीवर गीतरामायण चालू आहे.ऐकताय का? खाकी परिवहनीय वेषातल्या वाहकाकडून हा अनपेक्षित प्रश्न ऐकूनच मी चक्रावलो.
जरासा सावरुन बसत मी “हो हो ऐकतोय तर रोज. असं म्हणून मी त्याला माझ्या जीवनात गीतरामायणाचे काय मुल्य आहे याचा सारा तपशील कथन केला. पण मला आत्ता ते सांगायचं नाही. तर या वाहकाकडून जी रसिकता जोपासली गेलीय ते सांगायचंय. अत्यंत रुक्ष, तितकाच कठीण जबाबदारीचे काम असणारा हा वाहक व्यवसाय! तद्दन रटाळ गणवेष, अंगावर असंख्य नमुनेदार माणसांशी नित्यनवा येणारा संबंध, एकूणच बेभरवशाचे जगणं आणि गीतरामायण याचा सहसंबंध मला नवलाचा वाटला.
बरं त्याच्या गावाच नाव पण तितकच बोअर. बोरी. आडनाव पण धालपे. कुठलीही रसिकतेची जागा नाही. असा माणूस अत्यंत रसिकतेने गीतरामायण ऐकतो. त्या विषयी बोलतो. गदिमांचे थोरपण जाणतो. सुधीर फडके यांच्या गाण्याविषयी संगीतासंदर्भात बोलतो. श्रीधर, आनंद, सुमित्र या पुढच्या माडगूळकर मंडळींचे उल्लेख करतो. हे सगळेच नवलाचे. याचा निष्कर्ष असा वाटतो की, रसिकतेचा झरा मुळचाच खरा असला की त्या पुढे कोणताच प्रश्न उभा राहत नाही.
बारामती भवानीनगर या पंधरा मिनिटाच्या पंधरा किलोमीटर प्रवासात आमचा काव्यशास्त्रविनोद छान झाला. उतरताना मी त्याचा फोटो आणि फोनक्रमांक घेतला. असे कितीतरी छुपे रसिक गावोगावी असतील. ते असे गवसले अचानक की होणारा आनंद आणि समाधान वेगळेच.











