सुपे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील जनाई उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाच्या सुरुवातीपासूनच येथे नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दोन वेळा भेट दिली आणि आज थेट मंत्रालयात बैठक घेत उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या यातील काही मागण्या यापूर्वीच मान्य झाल्या होत्या परंतु उरलेल्या सर्वच मागण्या आज मान्य झाल्याने सुप्यातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, कोळोली, नारोळी, दंडवाडी, खोपवाडी, पानसरेवाडी, काळखरेवाडी, खैरे पडळ, राजबाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, भोंडवेवाडी कुतवळवाडी बोरकरवाडी, चांदगुडेवाडी, खंडूखैरेवाडी, मांगोबाचीवाडी, वढाणे, आंबी खुर्द, तसेच पुरंदर तालुक्यातील रिसे, पिसे, खोपडेवाडी, राजुरी, नायगाव, पांडेश्वर, रोमनवाडी या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने जनाई उपसा सिंचन योजनेतून नियमित हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
चार शेतकरी प्राथमिक स्वरूपात या उपोषणाला बसले होते. उपोषणास बसलेले पोपटराव खैरे, सचिन साळुंखे, भानुदास बोरकर व त्यांना मदत करणाऱ्या शेतकरी कृती समितीतील सदस्यांनी या उपोषणाची व्याप्ती वाढवली होती. त्याची तातडीची दखल खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. अजित पवार यांनी तर तब्बल दोन वेळा अचानक व थेटपणे सुप्यात येत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेत उर्वरित सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती.
या बैठकीत जनाई उपसा सिंचन योजनेचे या बैठकीत जनाई उपसा सिंचन योजनेचे संबंधित सर्व मागण्या सकारात्मक पद्धतीने सरकारने स्वीकारल्या. यामध्ये जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी हक्काचे मिळाले पाहिजे व त्याचे संपूर्ण नियोजन वर्षाचे तयार झाले पाहिजे अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती. त्याचबरोबर या योजनेचे संपूर्ण लाईट बिल राज्य शासनाने कायमस्वरूपी भरावे अशी देखील मागणी यामध्ये होती. या योजनेच्या कालव्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याचे भूसंपादन करून त्याची भरपाई तातडीने मिळावी अशी देखील मागणी होती. जनाई उपसा सिंचन योजना प्रकल्प संपूर्ण सौर उर्जेवर चालवावा अशी येथील एक मागणी होती आणि योजनेतील राखीव कोटा सोडून पावसाळ्यातील ओवर फ्लो झालेले पाणी या योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना मिळावे अशासह बारा मागण्या यामध्ये होत्या.
सुप्यामध्ये झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे हे फक्त आपणच सोडू शकतो असे सांगत फक्त आपल्याकडूनच कामे होतात अशी देखील पुष्टी जोडली होती. ती आज अजित पवार यांनी खरे करून दाखवत लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानंतर सुपे आणि इतर परिसरात शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.











