सिन्नर : महान्यूज लाईव्ह
एखादी गोष्ट वाटायला क्षुल्लक असते, पण त्यातून अनेक इप्सित किंवा हेतू साधले जातात. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे फक्त भांडणे मिटवणे आणि गुन्हे दाखल करणे एवढाच भाग नसतो. माणसांच्या दररोजच्या दुनियेतील लागणाऱ्या आवश्यक गरजा व त्यातून भविष्यात उद्भवू शकणारे वाद यावर वेळीच तोडगा काढणे, हे सुद्धा उत्कृष्ट पोलिसिंग असते..
अवघ्या काही दिवसातच तो सिंगम अधिकारी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात पदोन्नतीने आला आणि पुणे नगर जिल्हा पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही शहरांमधील वाहतूक कोंडी काही तासात सुटली अतिक्रमणे हटली आणि रस्त्याने मोकळा श्वास घेतला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून नायलॉन दोरीचा केलेला प्रयोग शहरवासींसाठी एक दिलासा देणारा ठरला आहे.
सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन नागरिकांना जण्यायेण्यासाठी मोठा त्रास होत होता. त्यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे. सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजीबाजार, भाजीविक्रेत व हातगाडी, टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौजफाटा घेऊन २६ जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या.
त्याप्रमाणे त्यांनी आपली दुकाने मागे घेतली. ही कारवाई ४ तास चालली. पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना २७ जानेवारी रोजी सोबत घेऊन सकाळपासून २ ते अडीच तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खिळ्याने मजबूत ठोकण्यात आल्या.
यापुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांना कारवाई ला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला. या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, हवालदार सुकदेव जाधव, माणिक टिळे, विनोद गोसावी, समाधान बोराडे, धनाजी जाधव, हेमंत तांबडे, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, मंगलसिंग सोनवणे, प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते, प्रशांत गरगटे, सागर वराडे, गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले.











