बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने राज्य शासनाच्या करिअर कट्टा या उपक्रमात पुणे ग्रामीण विभागात जिल्हास्तरीय पातळीवर चारही विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या करियरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रभर विविध महाविद्यालयात करियर कट्टा हा उपक्रम राबविला जातो.
महाविद्यालयाने जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे ग्रामीण विभागात चारही गटात प्रथम क्रमांक पटकावला यामध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय (पुणे ग्रामीण) – प्रथम क्रमांक मिळविला असून उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य या घटकासाठी देखील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनीच प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एवढेच नाही उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयीन समन्वयक गटातही महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्ह्यातील उत्कृष्ट जिल्हास्तरीय करियर संसद या गटामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थी करिअर संसदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विभागीय स्पर्धेत पुणे विभागात येणाऱ्या पुणे नाशिक आणि अहमदनगर जिल्हातून महाविद्यालयास तीन पुरस्कार घोषित करण्यात आले. यामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाचा पुणे विभागात उत्कृष्ट महाविद्यालय गटामध्ये विभागात दुसरा क्रमांक आला असून, उत्कृष्ट प्राचार्य गटामध्ये विभागात डॉ. भरत शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला, तर महाविद्यालयीन समन्वयक गटात मात्र डॉ. सुनील ओगले यांनी प्रथम क्रमांक विभागीय स्तरावर देखील पटकावला.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून गेल्या चार वर्षात १८८ विद्यार्थ्यांनी राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सन २०२३ मध्ये ११० पोलीस, १० फौजदार व ७ अधिकारी राज्यसेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातील २९८ विद्यार्थ्यांना यावर्षी प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने सेंटर ऑफ एक्सलन्स साठी करिअर कट्टा कडून दहा लाख रुपयाचे अनुदान महाविद्यालयास मंजूर झाले आहे. महाविद्यालयातील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी संसदेस, समन्वयक डॉ. सुनिल ओगले, प्राचार्य डॉ भरत शिंदे व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे करिअर कट्टाचे समन्वयक म्हणून डॉ. सुनिल ओगले यांनी गेल्या चार ते पाच वर्षात उत्तम कामगिरी बजावली आहे त्यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे असे गौरवोद्गार डॉ. भरत शिंदे यांनी काढले. तसेच करिअर कट्टा उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. संजय खिलारे व व, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. राजेश शर्मा, व प्रा. सुजाता पाटील व करिअर कट्टा समितीचे सर्व सदस्य, ग्रंथालय समिती सदस्य उपप्राचार्य डॉ. लालासाहेब कशिद, डॉ. शामराव घाडगे, महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या साठी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, सचिव निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंभोज यांनी प्राचार्य डॉ भरत शिंदे व डॉ सुनिल ओगले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.











