जुन्नर – महान्यूज लाईव्ह
शरद पवार आणि कार्यकर्त्यांचे नाते सर्वांनाच चिरपरिचित.. म्हणजे आज वयाच्या ८३ व्या वर्षीही पवारसाहेबांना कोणत्या गावातील कोणते कार्यकर्ते, नेते हे सांगावे लागत नाही. उभा महाराष्ट्र सातत्याने फिरलेल्या शरद पवारांनी काल याचा प्रत्यय दिला.
जुन्नर तालुक्यातील एका जाहीर सभेत शरद पवार बोलायला उठले. त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा अचानक सभेतून सुरू झाल्या. शरद पवारांनी काही क्षणच पुढे पाहिले आणि बोट दाखवत कोंडाजी वाघ का? असा प्रश्न केला.. पुन्हा काही क्षण थांबून त्यांनी शेजारच्या पदाधिकाऱ्यांना हे कोंडाजी वाघच आहेत का? असा पुन्हा प्रतिप्रश्न केला.. गर्दीतून कोणीतही हो तेच आहेत असे उत्तर दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
त्यानंतर पवार यांनी सभा येथे कोणतीही असू देत, कोंडाजी वाघ घोषणा देतातच अशी आठवणही नमूद केली. या सभेनंतर साहजिकच साऱ्यांनीच कोंडाजी यांना गाठले. आंबेगाव तालुक्यातील राझणी गावचे कोंडाजी रामजी वाघ यांनी शरद पवार यांनी दिलेल्या ओळखीला अगदी सहजपणे घेतले.
तेव्हा कोंडाजींनी सांगितले की, ते मंत्री असताना शरद पवारांना अनेकदा मुंबईला जाऊन भेटलोय.. त्यांच्या सभा मी ऐकतो असे त्यांनी सांगितल्यानंतर शरद पवार हे आमच्या जिवाचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे जिवाचे नेते आहेत असे सांगितले.
पाठीमागे एकदा दौंड तालु्क्यातील सभेत गर्दीत दूर अंतरावर एक व्यक्ती बसलेली होती, शरद पवार यांनी त्या व्यक्तीकडे बोट दाखवून व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्यास त्यांना बोलावण्यास पाठवले आणि तू भिवा शेलार का रे? असा प्रश्न करीत आपल्या मित्रास ओळखले.











