दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
गुठाळे येथील युवतीच्या खुन प्रकरणी युवकाला अटक करण्यात आली असून शिरवळ पोलीसांच्या धडाकेबाज कारवाईत शिरवळ पोलीसांनी कवटीवरुन शोध घेत सख्ख्या भावाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केवळ १० दिवसात गुन्हा उघडकीस आणला.
मौजे गुठाळे (ता खंडाळा) येथील गट नंबर २३७ मध्ये १६ डिसेंबर रोजी मानवी हाडांचे अवशेष शिरवळ पोलिसांना आढळून आले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आलेले होते. घटनास्थळाची पाहणी करता घटना स्थळाच्या आजू-बाजूस मिळून आलेले लेडीज सॅन्डल, कपडयांची बॅग व त्या मधील खाजगी कंपनीचा गणवेष यावरुन मिळालेले साहित्याची ओळख पटली .
नातेवाईकांचा शोध घेवून मानवी हाडांचे अवशेष हे शिरवळ येथील मयत युवती मनिषाकुमारी जिमदार महतो (वय १९ वर्षे मुळ रा. मांझी मियापट्टी माझी सारन जि. छपरा राज्य बिहार.हल्ली रा. शिरवळ ता खंडाळा जि. सातारा) हिचे असल्याचे तिचे नातेवाईकांनी ओळखले. यावेळी सदरील घटना ही घातपात असण्याची शक्यता गृहीत धरुन शिरवळ पोलीसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध अंगाने तपास करण्यास सुरुवात केली.
मयत युवती मनिषाकुमारी जिमदार महतो हिचे बिहार येथील गावातील युवकासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून व गावात बदनामी होत असल्याने मयत युवती मनिषाकुमारी तिचा भाऊ याला सदरील प्रेमसंबंध पसंत नसल्याच्या कारणातून मनिषाकुमारी हिचा स्कार्पने गळा आवळून खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
त्यावरुन शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांना सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ याला शिरवळ पोलीसांनी अटक केली असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय या बाबतचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास सी.व्ही. केंद्रे हे करीत आहेत.











