दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वेळे (ता.वाई) येथे पुणे सातारा महामार्गावर दुचाकी आणी ओम्नीच्या झालेल्या भीषण अपघातात केंजळ (ता.वाई) येथील एकजण जागीच ठार झाल्याने केंजळ गावावर शोककळा पसरली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, केंजळ (ता. वाई) येथील विनायक शामराव जगताप (वय ४६) हे सकाळी शिरवळ (ता. खंडाळा) येथील गोदरेज कंपनीत कामगार म्हणून कामाला होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या कामगारांची सुट्टी झाल्यावर विनायक जगताप हे
पुणे सातारा या महामार्गावरुन केंजळ येथील आपल्या गावाकडील घराकडे दुचाकीवरुन निघाले. त्यांची दुचाकी साडेचार वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावरुन वेळे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील पुणे सातारा महामार्गावर आली. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या पुढे चालत असलेल्या ओम्नी गाडीला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. या अपघातात विनायक शामराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिस सहाय्यक फौजदार राजे व किरण निंबाळकर यांनी घटनास्थळावर जाऊन विनायक शामराव जगताप यांचा मृतदेह ताब्यात घेतला व त्याचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.











