राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील निर्माण हॉटेल समोरील पार्किंग मधून चारचाकी गाडीची काच फोडली व बॅग चोरी करून अज्ञात चोरटा पळून तर गेला, पण जेव्हा यवत पोलिसांनी तपास केला, तेव्हा एक नाही, दोन नाही, तब्बल 11 ठिकाणी त्याने बॅग चोरी केल्या, हेही निष्पन्न झाले आणि तो सराईत चोर निघाला. पोलिसांनी यवत, दौंड, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ११ बॅग चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
घटना ८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता घडली होती. दौंड तालुक्यातील वाखरी गावच्या हद्दीतील निर्माण हॉटेल समोर स्विफ्ट डिजायर कार (एम.एच २४ ए.बी.२०५) पार्क करून लावलेली असताना पाठीमागील साईडची काच फोडून पर्स मधील मोबाईल रोख रक्कम असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेला. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली. पुणे सोलापूर महामार्गावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता यवत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा सराईत गुन्हेगार करण मोहन चव्हाण (रा.कुंभारी सोलापूर सध्या रा.ठाणे किशननगर सेक्टर १२) याने केला आहे,
त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन कुंभारी (जि. सोलापूर) येथून संशयित आरोपी मोहन चव्हाण (रा.कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर सध्या रा.ठाणे किशननगर सेक्टर १२) यास ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल चौकशी केली, तेव्हा आरोपी करण चव्हाण याने यवत पोलीस स्टेशन, दौंड, सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलचे पार्किंग मधून चार चाकीचे वाहनांची काच फोडून गाडीतील बॅग चोरून नेली असून त्याने पुणे ग्रामीण हद्दीतील यवत, दौंड, सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील ११ गुन्हे केल्याचेही उघडकीस आले. पोलीसांनी त्याच्याकडून 2 लाख 55 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, वळसंग पोलीस ठाण्याचे फौजदार उस्मान शेख, हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, राजू मोमीन, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, मारुती बराटे, सुनील कोळी यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहायक फौजदार बाळासाहेब गाडेकर करत आहेत.











