ज्ञानेश्वर रायते, महान्यूज
मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत सिकंदर शेखनं शिवराज राक्षेकडून पराभव स्वीकारला आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये पुन्हा तसेच चर्चा सुरू झाली की, सिकंदर शेखला डावललं गेलं. सिकंदर शेख ही तोलामोलाचाच होता.. नव्हे महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत तोलामोलाच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये असते, मात्र गेल्यावर्षीच्या पराभवाचे शल्य यावर्षीच्या विजयात रूपांतरित करताना सिकंदर शेखने गतविजेत्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेलाच झोळी डावावर 33 सेकंदात चितपट केलं आणि महाराष्ट्र केसरीचा 66 वा किताब पटकावला.
पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढत शिवराज आणि सिकंदर यांच्यात झाली. मागील वर्षीचीच पुनरावृत्ती होणार का? की, सिकंदर डाव पलटवणार याची चर्चा या मैदानात सकाळपासूनच सुरू होती. संध्याकाळी हि रोमहर्षक लढत सुरू झाली आणि अवघ्या एका 31 सेकंदात झोळी डावावर शिवराज राक्षेला घेत सिकंदर शेखनं मैदान मारलं.
त्यावेळी सिकंदर शेखचा आक्रमक पवित्रा वाखाणण्याजोगा होता. या मैदानानंतर अनेक जणांनी एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो, अखेर सिकंदर शेखनं मैदान मारलंच असं म्हणत सिकंदरचं कौतुक करायला सुरुवात केली. अर्थात गेल्यावर्षीच्या पराभवानंतर एक वर्ष सिकंदर काय करत होता याची चुणूक मात्र या निमित्ताने सर्वांना पाहायला मिळाली. पराभवातून माणसाने हेच शिकावं! पुन्हा एकदा जिंकण्यासाठी उभारी घ्यावी! ही उभारी घेण्यासाठी काय करावे, तेही सिकंदर कडून शिकावं!
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीस पूर्वी ज्या उपांत्य लढती झाल्या त्यामध्ये माती विभागातून सिकंदर शेखने संदीप मोटेचा पराभव केला होता तर गादी विभागातून शिवराज राक्षेने हर्षद कोकाटे चा पराभव केला आणि दोघांनीही दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मागील वर्षी सेमी फायनल मध्येच सिकंदर शेख ला पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र त्याची कसर त्याने 66 वा महाराष्ट्र केसरी बनूनच भरून काढली











