छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावची! मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी गावातही मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते, हे उपोषण संपले तेव्हा आपल्या गावातील कुणबीच्या नोंदी कुठे सापडतील अशी चर्चा सुरू झाली आणि मग गावातीलच सोमीनाथ काकडे यांच्या घराने अख्ख्या गावाचा प्रश्न सोडवला.

त्याचं झालं असं की, धानोरा गावात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राधाकृष्ण काकडे या कार्यकर्त्यांसह इतर काही मराठा बांधव उपोषणाला बसले होते. आंतरवली सराटी येथील उपोषण संपले. त्यानंतर धानोरा येथीलही उपोषण संपवण्यात आले. उपोषण संपल्यानंतर आपल्या गावातील कुणब्यांच्या नोंदी मराठी शाळेमध्ये सापडतील अशी चर्चा सुरू झाली.
मग प्राथमिक शाळेत जाऊन दप्तर तपासणी करण्याचे ठरवले. त्यापूर्वीच गावातील सोमीनाथ काकडे यांनी आमच्या घरात वाडवडिलांनी ठेवलेली एक जुनी पेटी असून त्या ट्रंकमध्ये काही ऐतिहासिक दस्तावेज असल्याची माहिती दिली. मग सर्वांनी जाऊन सोमीनाथ काकडे यांच्या घरी ही ट्रंक खोलली. या पेटीमध्ये तब्बल पाच ते सहा फाईल सापडल्या. ज्यामध्ये कुणबी या नोंदी असल्याचे आढळून आले. चार ते पाच हजार नोंदी या पेटीत सापडल्याने गावाला जणू खजिनाच सापडल्याचा आनंद झाला.
या नोंदी काही उर्दू तर काही मराठीत असल्याने आपला कुणबी होण्याचा विषय मिटला असल्याचेच पाहत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. जवळपास संपूर्ण गावच या नोंदीमुळे ओबीसी होणार आहे, कारण शासनाने आता कुणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्याचा पुरावा अनेकांना मिळत नाही. तो धानोरा गावाने गावाच्या भावी पिढ्यांसाठी सोडवला. सोमीनाथ काकडे यांचे आजोबा पूर्वी तलाठी या दर्जाचे काम बघायचे. तालुक्याच्या सगळ्या नोंदी ते ठेवत होते. तेच दस्तावेज आता गावकऱ्यांच्या हाती लागल्याने सध्या गाव खुश आहे.











