विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : अजितदादा राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी होतात त्या यशामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानाही ते जपत असतात, अडचणीला ते धावून जातात आणि अनेक कार्यकर्ते आग्रह करतात आणि दादा कार्यकर्त्याचा आग्रह देखील मान्य करतात.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गाळप हंगामाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी वाघळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य असलेले तुषार सकुंडे या कार्यकर्त्याच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकुंडे परिवाराच्या घरी स्नेहपर भेट दिली.
त्याच झालं असं की, सोमेश्वर मंदिरमार्गे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा करंजेपुल येथे दाखल झाला. त्यावेळी वाघळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य असलेले तुषार सकुंडे व अन्य ग्रामस्थ दादांच्या स्वागतासाठी थांबले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा स्वागतासाठी थांबलेल्या ग्रामस्थांना पाहून त्या ठिकाणी थांबला.
दादांनी विचारलं.. कार्यक्रमाकडे ह्याच रस्त्याने पुढे जायचे आहे का? त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य असलेले तुषार सकुंडे यांनी, हो.. दादा, याच रस्त्याने पुढे जायचे आहे. त्यावेळी तुषार सकुंडे यांनी दादा मी गाडीत बसू का? अशी विनंती केली आणि दादांनी लागलीच गाडीमध्ये घेतलं. गाडीमध्ये बसल्यानंतर तुषार सकुंडे यांनी दादा माझे आजोबा रामचंद्र (काका) सकुंडे यांचा ९१ वा अभिष्टचिंतन कार्यक्रम यापूर्वी झाला आहे. तरी आपण माझे आजोबा रामचंद्र (काका) सकुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्या घरी भेट द्यावी.अशी विनंती केली. आपल्या कार्यकर्त्याचा आग्रह मोडतील ते अजितदादा कसले? दादांनी लगेच होकार दिला.
त्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अजितदादांनी सकुंडे परिवाराच्या घरी भेट देऊन रामचंद्र (काका) सकुंडे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तब्येतीची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला व ९१ वर्षी सुद्धा तब्बेत तंदुरुस्त असल्याबद्दल कौतुकही केले. वयाचे शतक पार करा. त्यावेळेस मी पुन्हा भेट देईल असेही सांगितले.
यावेळी सतीश सकुंडे यांच्याकडून घरातील सर्व सदस्यांची माहिती दादांनी जाणून घेतली. सतीश सकुंडे यांनी अजितदादांनी भेट दिल्याबद्दल दादांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे, राजकुमार सकुंडे, तुषार सकुंडे, केदार सकुंडे, अविष्कार सकुंडे व सकुंडे परिवारातील सदस्य व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.











