बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या होमिओपॅथिक पदवी असलेल्या डॉक्टरांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. कारण होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी वरदान असलेला सीसीएमपी हा कोर्स बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयात सुरू करण्यास नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिली आहे.
आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सन 2023 24 पासून सीसीएमपी कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
CCMP कोर्स सुरू करण्याकरिता बारामतीतील डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. याची तातडीने दखल घेत अजित पवार यांनी हा कोर्स येथे सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या व यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना दिल्या होत्या. त्यानुसार शासकीय स्तरावर याचा पाठपुरावा झाला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, उपाधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, फारमॅकॉलॉजी विभागप्रमुख डॉ. रामा भोसले यांनी पुढाकार घेतला. होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरकांडे, बारामतीतील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ. नंदकुमार झांबरे, डॉ. राकेश मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कोर्स येथे सुरू करण्यासाठी सुरुवातीला मागणी केली होती.











