बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय सर्वोपचार रुग्णालय व ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे प्रसिद्ध लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉक्टर संजीव ठाकूर हे 21 ऑक्टोबर रोजी म्हणजेच महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण तपासणी करणार आहेत.
डॉ संजीव ठाकूर हे प्रसिद्ध लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. त्यांनी आतापर्यंत २५ हजारपेक्षा अधिक यशस्वी लॅपरोस्कोपिक सर्जरी (दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया) केल्या आहेत. डॉ संजीव ठाकूर सर्व प्रकारचे हर्निया, पित्ताशय, पित्ताशयातील खडे, गर्भाशयाची पिशवी, नेफरेक्टोमी (किडनी चे ऑपरेशन), मूळव्याध, भगंदर, पित्ताशय, अपेंडिक्स, लठ्ठपणा, पोटातील गाठ व पोटातील इतर सर्व प्रकारचे ऑपरेशन वर अचूक निदान व उपचार करतात.
या सर्व त्रासांपासून त्रस्त असलेल्या बारामती, इंदापूर, वालचंदनगर, तसेच भिगवण, पाटस, फलटण व इतर नजीकच्या भागातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे मोफत करण्यात येणार आहे.
डॉ ठाकूर व त्यांचे सहकारी हे दर महिन्याचा तिसऱ्या शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती येथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत.
ससून सर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रियासुद्धा मोफत होते. आतापर्यंत १५ पेक्षा अधिक रुग्णांवर लठ्ठपणा कमी करण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. ससून रुग्णालयातर्फे प्रत्येक महीन्याचा तिसऱ्या शनिवारी डॉ ठाकूर यांचा बाहयरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे.











