संपादकीय
काल अंतरवली सराटीमध्ये न भूतो अशी मनोज जरांगे पाटलांची सभा झाली. मराठ्यांना आरक्षणाची गरज किती आहे हे दाखवणारी, परंतु अत्यंत शिस्तबद्ध असलेली ही सभा काल अनेकांच्या लक्षात राहिली. काल या सभेला लोक किती? यावर अनेक चर्चा झडताना दिसत आहेत, परंतु त्याहीपेक्षा पंढरीचा जो वारीचा सोहळा स्वयंशिस्तीचा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, तशाच स्वरूपाचा स्वयंशिस्तीचा महासोहळा काल देखील संपूर्ण जगाने अनुभवला.
काल धुळे सोलापूर असो किंवा इतर अनेक रस्ते कित्येक तास गर्दीने ओसंडून वाहत होते. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे जिथे मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू होती, तिथपासून ते पंधरा किलोमीटरच्या अंतरात फक्त लोक आणि गर्दी दिसत होती. त्यांच्यापर्यंत हा सभेचा महासोहळा मोबाईलच्या रूपाने पोहोचला. अनेकांना तो थेट पाहता आला नाही, परंतु त्यांनी दाखवलेली स्वयंशिस्त आणि जिथे मिळेल तिथे उभे राहून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाप्रती दाखवलेली आस्था हा काल फक्त महाराष्ट्राच्या नव्हे, तर संपूर्ण देशाच्या आणि जगाच्याही दृष्टीने कौतुकाचा सोहळा झाला.
लाखो लोक स्वयंप्रेरणेने येतात, स्वखर्चाने येतात, शांतपणे बसून राहतात. शेवटपर्यंत थांबून राहतात. कुठेही कसलाही गोंधळ नाही, गजबजाट नाही, कुठेही कसलाही अनुचित प्रकार नाही आणि जे दीडशे एकर क्षेत्र या सभेसाठी तयार करण्यात आले होते, त्या क्षेत्रात कचरा देखील राहणार नाही, इथपर्यंतची काळजी घेणारा हा समाज यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देखील सगळ्यांनी पाहिलाच होता.
सध्या राज्यात विविध पक्षांच्या सभा होतात. त्या सभांसाठी प्रचंड खर्च होतो, हाच खर्च गृहीत धरून छगन भुजबळ यांनी या सभेसाठी सात कोटी रुपये जमा झाले आहेत असे वक्तव्य केले आणि छगन भुजबळ जरांगे पाटलांच्या भाषणामुळे पुन्हा एकदा तोंडावर पडले. मनोज जरांगे पाटील यांनी या खर्चाचा हिशोब सांगितला. 130 गावांपैकी फक्त 22 गावांतून आम्ही 33 लाख रुपये जमा केले अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आणि तेवढाच खर्च या सभेसाठी येणार असल्यामुळे उर्वरित गावांकडून पैसे मागण्याची आमच्यावर वेळच आली नाही असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सात कोटींच्या आकड्यांचा खेळ इतर सभांसाठी असतो हे तिथल्या उपस्थित मराठ्यांनी क्षणातच ताडले. अर्थात मराठा समाजाच्या लोकांना येण्या-जाण्यासाठी तिथल्या जेवणासाठी किंवा इतर गोष्टींसाठी हा खर्च गृहीत धरून सांगितला असावा, परंतु या सभेसाठी आलेले सगळे समाज बांधव स्वखर्चाने आले होते. त्यांनी आपापली सोय केली होती आणि ते स्वयंप्रेरणेने आले होते. त्यामुळे येथे अतिरिक्त खर्च करण्याची गरजच नव्हती. थोडक्यात पहिल्यांदाच मागील दोन अडीच वर्षात अशा प्रकारची स्वयंस्फूर्तीची सभा झाली आणि ती सगळ्यांच्या डोळ्यात भरली.
सभेला गर्दी किती याची सध्या चर्चा सुरू आहे. सूत्रानकडील माहितीनुसार 170 एकरामध्ये असलेल्या गर्दीचा आकडा आठ ते दहा लाखांचा सांगितला गेला, मात्र 170 एकरातील बैठक व्यवस्था पाहिली, तर ती 16 ते 20 लाखापर्यंत जाते असाही अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दुसरीकडे त्याचवेळी दहा ते पंधरा किलोमीटर पुढे अशीच गर्दी कायम होती. त्यामुळे संपूर्ण आकडा लक्षात घेतला, तर या सभेसाठी 25 लाख लोक उपस्थित राहतील असा जो अंदाज व्यक्त केला जात होता. तो अंदाज प्रत्यक्षात साकारल्याचेही सांगितले जात आहे.











