बारामती : महान्यूज लाईव्ह
माय लेकराचं नातं जगावेगळंच असतं.. अलीकडच्या त्रिकोणी- चौकोनी कुटुंब पद्धतीतही माय लेकराचे संबंध हृदयापासून हृदयापर्यंतचे आहेतच.. फक्त अलीकडे अनेक ठिकाणी विशेषतः शहरी भागात मुलं आईजवळ किंवा आई मुलाजवळ राहत नाही, अशा काही घटना आपण ऐकतो, पण बारामती तालुक्यातील हे नातं कायम असल्याचं एका आईनं अनेक लेकरांना दाखवून दिलंय.
घटना आहे बारामती तालुक्यातील जळूची येथील 27 वर्षीय हनुमंत भाऊ सुळ हा युवक मागील एक वर्षापासून किडनी विकाराने त्रस्त होता. किडनी प्रत्यारोपण करावेच लागेल असे डॉक्टरांनी अनेक तपासण्यातून सांगितल्यानंतर सुळ कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी चौकशी करून किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय शोधला. परंतु त्या सर्व ठिकाणी निराशा आली.
अखेर हनुमंत सुळ यांच्या आई शालन यांनी माझी किडनी चालेल का? हे डॉक्टरला विचार असे सांगितले. 54 वर्षीय शालन यांचे पती आठ वर्षापूर्वी निवर्तले आहेत. आपल्या मुलाच्या जीवावर बेतले नाही पाहिजे ही भावना लक्षात घेत मुलाची वेदना लक्षात घेऊन या आईने आपली किडनी देण्याचे ठरवले. हनुमंत यांचे भाऊ अविनाश यांनी जळोची गावातीलच रहिवासी परंतु बारामतीतील प्रसिद्ध विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अमोल सातकर यांची यासाठी मदत घेतली.
अँड अमोल सातकर व अविनाश सूळ या दोघांनी माहीती घेऊन या दोन्ही माय लेकराला घेऊन तामिळनाडूतील कोईम्बुतर येथील खाजगी रूग्णालय गाठले. तिथे संपुर्ण चाचण्या करून घेतल्या. आई शालन यांची किडनी हनुमंत यांना चालू शकते असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईचा आनंद गगनात मावेना. अखेर 13 ऑक्टोबर पर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होऊन शालन आणि हनुमंत यांच्यातील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वकील अमोल सातकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, दोघांचीही प्रकृती आता उत्तम व स्थिर आहे. या शस्त्रक्रियेसाठी सूळ कुटुंबाला जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च झाला. शासनाकडून या कुटुंबाला आर्थिक मदत झाली, तर आधार मिळेल. त्यासाठीची प्रक्रिया करायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.











