बारामती – महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे बारामती तालुक्यातील लाटे परिसरातील.. वीस दिवसांपूर्वीची.. घरात छोट्या बहिणीची चेष्टा करता करता तिला कोंडणाऱ्या १२ वर्षीय भावाला आईवडील रागावले.. मग वडील कामाला गेले.. अन मुलगा ट्यूशनसाठी बाहेर पडला… थोड्याच वेळात वडीलांना फोन गेला.. तुमच्या मुलाने विषारी औषध घेतले आहे.. अन वडीलांच्या पायाखालची वाळूच सरकली.. हातावरचे पोट अन भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या या कुटुंबाला काय करावे तेच कळेना.. अशाच अवस्थेत तोंडाला फेस आणि बेशुध्दावस्थेत असलेल्या मुलाला बारामतीतील दवाखान्यात आणले, तेव्हा डॉक्टरांचाही जीव कळवळला.
बारामती शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये आज (ता.११) जेव्हा भेट दिली, तेव्हा एक छोटा मुलगा तोंडातून जास्त आवाज येत नाही, तो अत्यंत आत्मविश्वासाने बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे यांच्याशी बोलत होता. डॉक्टरांशी त्याची गट्टी जमली होती. बारामती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. निधी महाडिक व बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे यांनी दवाखान्यातील डॉक्टर व परिचारकांच्या मदतीने या मुलाचे प्राण वाचवल्याने हा दवाखाना त्याच्यासाठी पुनर्जन्माचे ठिकाण ठरला. आज जेव्हा त्या मुलाच्या वडीलांशी बोलायला सुरवात केली, तेव्हा तर अनेकदा हात जोडून त्या मुलाचा बाप दवाखाना आणि डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होता.
वीस दिवसांपूर्वी या मुलाला दवाखान्यात आणले, तेव्हा दोन बाटल्या शेतातील किटकनाशक मारण्याचे औषध त्याने घेतल्याचा डॉक्टरांना अंदाज आला आणि त्याला वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू, मात्र त्याचे बचावण्याची संधी तशी कमी असल्याची कल्पना आईवडीलांना देताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाला वाचवाच अशी आर्त साद घालतानाच त्या उपचारासाठी पैसे कोठून आणायचे हाही प्रश्न पडला. या कुटुंबाची आर्थिक स्थिती लक्षात घेत दवाखान्यानेही सहकार्य केले, उपचाराच्या खर्चात शक्य तितकी सवलत दिली, गावातील लोकांनाही सहकार्य केले आणि शासकीय योजनेचाही लाभ मिळवून देण्यासाठी दवाखान्याने पुढाकार घेतला.
वीस दिवसांच्या अथक उपचारानंतर आता मुलाची प्रकृती स्थिर आहे. आईवडील तर कृतज्ञ आहेतच, परंतू त्याच्यावर उपचार करणारे शहरातील प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधेही पहिल्या दिवसापासूनच्या घटनेला उजाळा देताना भावनिक झाले होते. त्यांनी तर त्याच दिवशी सोशल मिडियावर पोस्ट लिहून आपली भावनिकता स्पष्ट केली होती. मुलगा वाचला याचे खूप समाधान आहे असे जेधे यांनी सांगितले. मात्र अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल ते शोधण्याचा, जनजागृती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.











