दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये हजारो असंघटीत कामगार काम करत आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि कंपन्यांना कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांमार्फत अन्याय होत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी पक्षाचे सातारा जिल्हा कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे यांच्याकडे आल्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेऊन संतोष ननावरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन जिल्ह्यातील कामगारांच्या व्यथा मांडून पिचलेल्या कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. त्यांनीही सातारा जिल्ह्यात एमआयडीसीतील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी जातीने लक्ष घालून सर्व समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी जिल्हाध्यक्षांना दिले.
सातारा जिल्ह्यातील एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणी, महिला व पुरुष काम करत असतात. त्यातील कंपनी आणि ठेकेदाराची मर्जी संभाळून काम करणारे कर्मचारी कंपनीने कायम केले, पण अल्पपगारावर क॔त्राटी पध्दतीने आजही अनेक कामगार ठेकेदारांमार्फत काम करताना दिसत आहेत.
अशा असंघटीत कामगारांचे आयुष्य धोक्यात आले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच राष्टवादी पक्षाने असंघटीत कामगार सेलची स्थापना संपूर्ण राज्यात केली आहे. या मार्फतच जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझी व माझ्या सहकाऱ्यांची राहणार आहे. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक असंघटीत कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे ननावरे यांनी सांगितले.











