सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व निहाल ठाकरे यांच्या पत्नी अंकिता पाटील ठाकरे यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान या निवडीचे स्वागत करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवू अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी त्यांची निवड जाहीर केली. या निवडीचे इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केले, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांसह युवा कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.
अंकिता पाटील यांची राजकीय कारकीर्दीची सुरुवातच बावडा लाखेवाडी या जिल्हा परिषद गटापासून सुरू झाली. या ठिकाणी प्रचंड मताने त्यांनी विजय मिळवला आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. इंदापूर तालुक्यात प्रभावी जनसंपर्क आणि महिला प्रश्नावर सातत्याने त्या मांडत असलेली प्रभावी मतमांडणी यामुळे अंकिता पाटील ठाकरे राज्यातही सुपरिचित झाल्या आहेत. त्या इंदापूर तालुक्यातील विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.