ज्ञानेश्वर रायते – महान्यूज लाईव्ह
त्याला अधिकारी बनायचं होतं.. पण तो बनला एक प्राथमिक शिक्षक.. शिक्षकी पेशातही मुलांना हरहुन्नरी करण्यासाठी त्याची धडपड पहिल्यापासूनच होती.. मात्र तरीही कुठेतरी ते अधिकारी पदाचं स्वप्न त्याच्या मनात रुंजी घालायचं.. मग त्याला वाटलं.. आपल्याला नाही होता आलं अधिकारी.. पण आपल्या सभोवती असे अनेक जण आहेत, ज्यांना महागड्या अकॅडमींमध्ये शिक्षण घेता येत नाही, पण त्यांची उर्मी मात्र जोमात असते.. अशांसाठी त्याने शहरांमध्ये, गावोगावी फिरून स्पर्धा परीक्षा सोप्या व्हाव्यात म्हणून ट्रिक्स देण्यास सुरवात केली..
त्या ट्रिक्सही सहजसोप्या होत्या.. म्हणजे एखादे वाक्य बनवायचे, मात्र त्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे किंवा ऐतिहासिक ठिकाणे किंवा महापुरूषांच्या नावांची आद्याक्षरे एकत्र असतील.. परीक्षेत हे परीक्षार्थी कुठेही चुकू नयेत, अशा त्याची धारणा.. मग त्याने राहत्या घरातच एक ट्रिक्स सुरू केली.. मुलींसाठी त्याने राहण्याचीही व्यवस्था केली. पेईंग गेस्ट परीक्षार्थींना त्याने शिकविण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता त्याच्या ट्रिक्स करिअरमध्ये रुपांतरीत होऊ लागल्या.. अनेकींचे, अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊ लागले.. आणि पाहता पाहता या प्राथमिक शिक्षकाच्या यशाच्या ट्रिक्स प्रत्यक्षात साकारू लागल्या..
नुकताच या ट्रिक्स अभ्यासिकेच्या घरातील स्वप्नील चौधर हा कर सहायक बनला आहे, गेल्या ५ वर्षात त्याच्या या घरातून अधिकारी बनलेला स्वप्नील हा ३३ वा अधिकारी आहे…आणि या अधिकारी बनविणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकाचं नाव आहे.. रोहिदास बिनवडे..!
इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावातील लकडेवस्ती येथील जिल्हा परीषदेच्या शाळेतील या प्राथमिक शिक्षकाने फार मोठे काम केले आहे. आज त्यांच्या या शाळेत पहिली ते चौथी इयत्तेतील २२ विद्यार्थी शिकतात, तर त्यांच्या अभ्यासिकेतून अधिकारी बनून गेलेल्यांची संख्या आहे तब्बल.. ३३!
त्यांनी नेमकं काय केलंय, हे पाहण्याअगोदर बिनवडे या आयुष्याच्या नव्या ट्रिक्सकडे कसे वळले ते पाहूयात.. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वंजारवाडी हे खरेतर बिनवडे यांचे गाव. ते शिकले पुण्यात. घरची परिस्थिती बेताचीच.. भाकरीचा चंद्र शोधण्यास जिंदगी घालविणाऱ्या स्थलांतरीत कुटंबांपैकीच एक त्याचं कुटुंब..!
त्यांचे वडील पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात हमाली करायचे. त्यामुळे परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागेल, अन्यथा परिस्थिती आपल्याला बदलून टाकेल ही भिती होतीच.. म्हणून पोटाला पीळ पडेपर्यंत तिकडे वडील राबत राहीले आणि त्याच वडीलांच्या प्रामाणिकपणाकडे पाहत रोहिदास यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा मनापासून सुरू केला.
लहानपणापासूनच चुणचुणीत असलेल्या रोहिदास यांनी शिक्षकांची मनेही जिंकली आणि शैक्षणिक आयुष्यही.. सन २००१ मध्ये जिल्हा परीषदेच्या शाळेत नोकरी मिळवली. सुरवात झाली मुळशीमधून.. त्यावेळेपासूनच शाळा सुटल्यानंतर इतर मुलांना शिकविण्याचा प्रयत्न सुरू होता. तो तसाच सुरू राहीला. याच काळात पुण्या-मुंबईला अधिकारी बनण्यासाठी अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांना होणारा आर्थिक त्रास त्यांनी जवळून पाहिला.
सन २०१० मध्ये त्यांची बदली बारामती तालुक्यात झाली. आणि येथील ग्रामीण भागातही अधिकारी बनण्याची स्वप्ने घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात बिनवडे सर आले. मग बारामतीपासून ते पुण्यापर्यंत विविध महाविद्यालये, अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी रोहिदास बिनवडे जाऊ लागले.
त्यांनी शोधलेल्या ट्रिक्स विद्यार्थ्यांना आवडू लागल्या. मोठमोठ्या किचकट संकल्पना पाठ कशा करायच्या याचे ज्ञान त्यांना अवगत असल्याने त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला. बिनवडे सरांचे मार्गदर्शन परिक्षार्थींना आवडू लागले, मात्र आपल्या सभोवती फिरणाऱ्या, सरकारी शाळेत शिकणाऱ्या अल्पउत्पन्न गटातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुण्यामुंबईतील या महागड्या अभ्यासिका कशा परवडणार? असा प्रश्न त्यांना पडला..
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागात तेव्हा महिन्याला २ ते ३ हजार रुपये खर्च यायचा, हे पाहून अस्वस्थ झालेल्या बिनवडे यांनी जे आपल्या संपर्कात आहेत, ज्यांना महागडे शिक्षण परवडणार नाही अशांसाठी घरातच ट्रिक्स अभ्यासिका सुरू केली. विद्यार्थ्यांनीच मोफत नको, म्हणून अगदी ३०० रुपये महिना असा प्रशिक्षणाचा खर्च त्यांनी ठेवला आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांच्या ट्रिक्स अभ्यासिकेत लक्ष घातले. दर्जेदार सुविधा देणाऱ्या या अभ्यासिकेतून आजवर अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि आजपर्यत अधिकारी बनले ३३ जण..! ( शिक्षक रोहिदास बिनवडे यांना तुम्ही 9158835370 आणि 8830287530 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.)











