दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याकडून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य केले जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची वासरे, शेळ्या मेंढ्या पाळीव जनावरे दगावली जात आहेत. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र शेतकरी व नागरिकांचे फोन उचलत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
दौंडच्या पूर्व भागातील नदीपट्ट्यातील शिरापूर, हिंगणीबेर्डी, मलठण, वाटलुज, राजेगाव, नायगाव या भागात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्यांचे कुटुंब मुक्त वावर करताना दिसून येत आहे. बिबट्या खुलेआम फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्ट झाले आहे. तसेच रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांना शेतांमध्ये बिबट्या दिसून आला होता.
नदीकाठालगत असलेल्या काटेरी वन आणि उसाचा लांबलचक सलग पट्टा असलेल्या या भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत मोकाट कुत्रांची शिकार करणाऱ्या या बिबट्याने आता शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य करुन हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. हिंगणीबेर्डी येथे मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील गाई, म्हशी, वासरांवर हल्ले केले.
या हल्ल्यामध्ये एक वासरू जागीच दगावले असून तीन वासरे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच हिंगणीबेर्डी गावचे माजी उपसरपंच प्रकाश ढवळे यांच्या गोठ्यातील तीन लहान वासरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात गाईचे वासरू जागीच दगवले असून दोन म्हशींच्या रेड्या (पारडी) गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच शेजारील शेतकरी चंद्रकांत ढवळे यांच्या गोठ्यातील लहान वासरावरही बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.
मागील पंधरा दिवसांपूर्वी मलठण येथे गाईची शिकार झाली होती. या परिसरात शेतकरी व शेतमजुरांना दिवसाढवळ्या बिबटया वावरताना दिसला होता. शिरापूर, हिंगणीबेर्डी, मलठण, वाटलुज, राजेगाव, नायगाव या परिसरात व वाड्यावस्त्यांवर रोज कुठे ना कुठे बिबट्याचे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याचे चित्र आहे. पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी हतबल व अस्वस्थ झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला झाल्यास शेतकरी त्वरित वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून बिबट्यांच्या दहशतीमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, शेतमजूर भयभीत झाले आहेत.
मात्र याबाबत वनविभाग अद्यापही सतर्क झाला नसून पंचनामा करणे व या भागात पिंजरा लावणे याबाबत वन विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे. या भागात बिबट्याची संख्या नेमकी किती आहे ? हे अद्याप वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत असूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकरी व नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.











