नगर : महान्यूज लाईव्ह
पंधरा दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षत्र लॉन्स येथे मंडप चालकास आणि त्याच्या सहकाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न चार जणांच्या टोळीने केला होता. कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघा जणांना लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अभिषेक विजय मोढवे, (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीला न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे १९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री मालवाहू टेम्पो (एम.एच.16.ए.वाय.937) घेऊन जाणाऱ्या दोघांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडील ११ हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
तपास सुरू असताना गुन्ह्यात अभिषेक विजय मोढवे या संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार अश्विनी मोरे, संदिप पितळे, तानाजी पवार, सत्यजीत शिंदे, दिपक रोहोकले यांनी ही कारवाई केली.










