सेंद्रिय शेतीचे प्रश्न राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार,शेती क्षेत्रात बदल होत आहेत त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत. सांगोला येथे सेंद्रिय शेती उत्पादकांची बैठक!
विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
सांगोला : सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्न राज्य व केंद्र सरकारपुढे मांडणार असून त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. सांगोला येथे हर्षदा लॉन्स येथे महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य मोर्फा या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे, जयमाला गायकवाड, नाथाभाऊ जाधव व मोर्फाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंग हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत, त्या बदलाची नोंद घेऊन पावले टाकली पाहिजेत. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. मोर्फा राज्य संघटनेसाठी पुणे आणि मुंबई येथे सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ही शरद पवार दिले.
तसेच सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढविणे व मार्केटिंग करण्यासाठी मदत करू असेही आश्वासन शरद पवार यांनी दिले.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, जगभरात सेद्रीय व विषमुक्त शेतीमालाचे महत्त्व वाढत आहे. सदर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी मोर्फा संघटनेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार बरोबर चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू.
मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे बोलताना म्हणाले, सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेत आहेत, पण मार्केटिंग करताना शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. डाळिंब, द्राक्षांसारख्या फळ पिकांची निर्यात करण्यासाठी त्याच्या वाहतूकीवर सवलत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना प्रीमियम रेट मिळू शकतो. कोव्हिडनंतर या गेल्या तीन वर्षापासून जहाजाच्या वाहतुकीमध्ये चार पट वाढ झालेली आहे व निर्यातीसाठीचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे डाळिंब निर्यातीत अडचणी येत असून चांगल्या क्वालिटीच्या डाळिंबाला चांगला भाव मिळणे अवघड झाले आहे. नैसर्गिक शेतीपेक्षा आम्हाला कमर्शियल ऑरगॅनिक फार्मिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोर्फाचे संचालक अमरजीत जगताप यांनी केले. सदर सेंद्रिय व विषमुक्त शेती चिंतन बैठकीला राज्यभरातून मोर्फाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड प्रभाकर चांदणे, संजय कट्टे, आनंदराव पाटील, अशोक नरळे, नामदेव सिद, नाना माळी, दिलीप बंडगर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोर्फा चे संचालक हरिभाऊ यादव, संजय दवले, नितीन तावरे, सतीश पाटील, संजय दिघे, यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे संचालक सुरेश पवार, किसान गुरुचे संचालक संजय मेटकरी, नागेश बिचुकले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारत मुढे यांनी मानले.