विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
ही कहाणी आहे, बारामती तालुक्यातील होळ साळबावस्ती येथील ज्ञानेश्वर पांडुरंग मदने यांची! घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि दुसरीकडे जन्मत:च दिव्यांग, पण तरीही ज्ञानेश्वराने न खचता, असलेल्या परिस्थितीवर मात केली आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये राज्यात सहावा क्रमांक मिळवला.
ज्ञानेश्वर मदने यांचे आई-वडील आजही दुसऱ्याच्या शेतात राबतात, पण ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्ञानेश्वर मदने यांनी कठोर परिश्रम घेतले आणि परिस्थितीवर व शारीरिक व्यंगावरही मात करत यश खेचून आणले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपंग प्रवर्गातून राज्यात सहावा क्रमांक मिळवला व मंत्रालयातील लिपिक पदाला गवसणी घातली.
ज्ञानेश्वर दोन्ही पायांनी जन्मजात दिव्यांग आहे. ज्ञानेश्वरला त्याच्या लहान बहिणीने मुक्ताईने सायकलवरून शाळेत ने आण केली. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण मुक्ताई पाठीशी असल्यामुळे पूर्ण झाले. मग त्याची शाळेची जिद्द आणि आवड पाहून ज्ञानेश्वरच्या मित्रांनी आणि परिसरातील दानशूरांनी त्याला मदत केली आणि ज्ञानेश्वर शिकत गेला.
अशा परिस्थितीमध्ये त्याला घरची प्रतिकूल परिस्थिती आडवी आली नाही, त्यामुळे त्याने चिकाटी धरली. जिद्द आणि परिश्रमातून, परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी तब्बल सहा वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत अखेर यश मिळवले. ज्ञानेश्वर हे केमिस्ट्री या विषयात बीएससी पदवी संपादन केलेले विद्यार्थी आहेत.
आळंदीचे सामाजिक कार्यकर्ते डी. डी.भोसले आणि विलास काटे यांनी ज्ञानेश्वरला सन 2012-13 साली नवीन तीनचाकी दुचाकी घेऊन दिली होती. त्यामुळे ज्ञानेश्वरचे पुढचे काम थोडे सोपे झाले. ज्ञानेश्वर यांना सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक गणेश सावंत, सतीश काकडे, संतोष कोंढाळकर हे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांना मदत करत राहिले.