बारामती : महान्यूज लाईव्ह
सांगोल्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज संध्याकाळी उशिरा बारामतीत पोहोचत आहेत. राष्ट्रवादीतील विविध घडामोडीनंतर पहिल्यांदाच शरद पवार बारामतीत येत आहेत.
आज रविवारी संध्याकाळी उशिरा गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील शरद पवार यांनी निवृत्त होणार असल्याच्या जाहीर केलेल्या निर्णयानंतर राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या, मात्र त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना त्यांचा निवृत्तीचा निर्णय त्यांना मागे घ्यायला लावला.
या घडामोडीनंतर शरद पवार गोविंदबागेत आले होते, त्यानंतर बारामतीत काही कार्यक्रमही झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समवेत झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीय बारामती फिरकले नसल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होती.
त्या पार्श्वभूमीवर त्यांची बारामती भेट महत्वाची मानली जात आहे. कारण स्वातंत्र्यदिनानंतर शरद पवार यांचा बीड दौरा असून तिथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे सभा घेतली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाच्या संभाव्य शक्यतेमुळे या सभा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्यांची बीड जिल्ह्यात सभा होणार आहे.