नगर : महान्यूज लाईव्ह
काही वर्षांपूर्वी मोबाईल ही काही चोरीची गोष्ट आहे का? असा प्रश्न आपल्याला पडला होता. परंतु आता जिथे डाळिंब, एवढेच नाही शेवग्याची शेंग आणि टोमॅटो देखील चोरटे सोडत नाहीत, तिथे मोबाईल कसे सोडतील? दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकातरी मोबाईलची चोरी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अशावेळी नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांनी एक धडाकेबाज कामगिरी करताना, तीन महिन्यात चोरीला गेलेले बहुसंख्य मोबाईल शोधून ते तक्रारदारांना परत केले आहेत.
कालपरवा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात महागडे मोबाईल चोरीला गेले होते, त्यांची किंमत अंदाजे एक लाख 62 हजार रुपये एवढी आहे. हे मोबाईल चोर पोलिसांनी पकडले आणि ते सातही महागडे फोन तक्रारदारांना परत केले. त्यामुळे मागील तीन महिन्यात अशा परत करणाऱ्या मोबाईलची संख्या 39 वर पोहोचली आणि त्यांची किंमत तब्बल सहा लाख रुपयांवर!
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला दिले होते.
कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून गेल्या तीन महिन्यात चोरीतील सहा लाख रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना सलीम शेख, राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली.
गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.