विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
स्थळ.. बारामती भिगवण रस्त्यावरील दत्त बेकरी समोरचा परिसर.. संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आणि अचानक रस्त्याने चालता चालताच ज्येष्ठ नागरिक अडखळून पडतात.. त्यांच्या कुटुंबीयांखेरीज शेजारी कोणीच नसतं.. तेवढ्यात तिथूनच मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर आलेले बारामतीतील भूलतज्ञ डॉ. सुजित अडसूळ त्यांची पत्नी डॉ. वृषाली अडसूळ व सामाजिक कार्यकर्ते सुशील जगताप हे दृश्य पाहतात आणि ते धावत पळत त्या ठिकाणी पोहोचतात..
परिस्थिती लक्षात आलेली असते.. डॉक्टर म्हणून गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात जनजागृती करताना सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला रुग्णांना तातडीचा द्यावयाचा प्रथमोपचार ज्यांना माहित आहे, ते डॉक्टर सुजित अडसूळ योगायोगाने त्या ठिकाणी असतात.. तातडीने त्या ज्येष्ठ नागरिकाला सीपीआर देऊन त्यांची परिस्थिती काहीशी व्यवस्थित केली जाते आणि त्यानंतर धावपळ सुरू होते ती रुग्णवाहिकेसाठी!
काही लोक बघत होते, काही बघून पुढे जात होते. डॉ वृषाली यांनी गाडी मिळतेय का ते बघण्यासाठी पुढे रस्त्यावर गेल्या आणि इकडे डॉ. अडसूळ यांनी आजोबांना CPR देण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. (CPR म्हणजे जिवन संजीवनी क्रिया, या मध्ये रुग्णाला सपाट जागेवर झोपवून छातीच्या मध्यभागी, हृदयाच्या वर दाब देऊन हृदयाची गती चालू ठेवण्याचा प्रयत्न करणे.)
आता रुग्णाला जरा हुशारी वाटू लागली होती. ते सावध झाले होते. आजोबांना साखरेचा त्रास पण होत होता. कदाचित रक्तातील साखर कमी झाली असेल म्हणूनही असेल, पण तोपर्यंत रुग्णाला उलट्या सुरू झाल्या होत्या आणि डॉक्टर अडसूळ यांना हार्दिक झटका असल्याचा अंदाज आला. त्यांनी तातडीने बारामतीतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर आर. डी. वाबळे यांच्याशी संपर्क साधला.
त्यामुळे डॉ. अडसूळ यांनी 108 या रुग्णवाहिकेला फोन करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा फोन लावूनही प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णवाहिका आलीच नसल्याने अखेर एका खाजगी रुग्णालयाची ओळखीची रुग्णवाहिका बोलावली. चालकाला परिस्थिती समजावून सांगितली आणि त्याला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्याची सूचना केली.
त्यानुसार अगदी पुढील तीन ते चार मिनिटांमध्ये हे आजोबा रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. त्यांच्यावरील उपचार करतानाच डॉ. आर. डी. वाबळे यांनी हा हृदयविकाराचा अत्यंत तीव्र झटका होता अशी माहिती दिली, तसेच आजोबांची साखरही वाढलेली होती अशी ही माहिती डॉ. वाबळे यांनी दिली. दरम्यान आता आजोबांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. आर.डी. वाबळे व डॉ. मिलिंद ठोंबरे यांनी दिली आहे. बारामतीतील देवदूत अगदी सहजपणे अशा पद्धतीने मदत करतात एवढेच!