राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात क्वचित कुठेतरी दिसणारा बिबट अर्थात बिबट्या हा जंगली भागात आढळणारा वन्य आणि हिंसक प्राणी. सध्या या बिबट्याचे दर्शन आता खेड्यापाड्यातही होऊ लागले आहे. दौंड तालुक्यातील गावागावात बिबट्याचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, बिबट्याच्या वावर ग्रामीण भागात वाढल्याने दौंड वन विभागाच्या अधिकारीही हातबल झाले आहेत. त्यामुळे वन विभागाकडून जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. काळजी आणि दक्षता घेण्याचे आवाहन ही वन विभागाकडुन केले जात आहे. दौंड तालुक्यातील सुरुवातीला राहू बेट परिसरातील भीमा नदीच्या काठालगच्या गावांमध्ये बिबट्याची एन्ट्री झाली. राहू परिसरात बिबट्याचे दर्शन घडू लागले.
त्यानंतर या बिबट्याने नदी काठालगतच्या कानगाव, नानगाव व हातवळण भागात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरे असलेल्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक शेळ्या मेंढ्या दगावल्या गेल्या. मध्यंतरी पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या पाटस व वरवंड परिसरात या बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना घडू लागले.
शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे उमटू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व शेतात काम करणाऱ्या महिला शेतकरी मुजरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गेले. त्यातच पाटस येथे पुणे सोलापूर महामार्गावर एका एका बिबट्या मादीचा अपघातात मृत्यू झाला. तर वरवंड मध्ये एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
मात्र तरीही बिबट्याचे वास्तव हे दिवसेंदिवस वाढु लागले. यवत परिसरातही अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना पहावयास मिळाले . मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याने एन्ट्री केली आहे. पुर्व भागातील शिरापूर, राजेगाव, नायगाव या भागात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला शेतात पाहिले आहे.
त्यामुळे या भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक प्रकारे तालुक्यात बिबट्याचे कुटुंब जसे वाढत चालले आहे तशी बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना बिबट्याने लक्ष्य केले आहे. तालुक्यातील अनेक गावांमधून पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
मात्र प्रत्येक ठिकाणी पिंजरा लावणे वन विभागाला शक्य नाही. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी दक्षता आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान याबाबत दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाले की, तालुक्यात बिबट्या दिसल्याचे अनेक तक्रारी येत आहेत.
अनेक ग्रामपंचायत पिंजरा लावण्याबाबत मागणी वन विभागाकडे करीत आहेत. पिंजरा बाबत जशी मागणी येईल तशा वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवला जात आहे. सध्या गावोगावात बिबट्याच्या संदर्भात जनजागृती केली जात आहे.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस शेतात काम करताना एकट्याचा घोळखाने जावे, शेतात काम करताना आजूबाजूला बिबट्या सदृश्य प्राणी आहे का नाही याची खात्री करून कामे करावी, शक्यतो महिला मजुर काम करत असतील तर त्या ठिकाणी पुरुषांनी सावधगिरी म्हणून त्या ठिकाणी दक्ष राहावे. नागरिकांनी दक्षता व काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.