विपुल पाटील, बारामती.
सदाबहार बॉलीवूड अभिनेत्री अनिता राज आज मॉर्निंग एक्सरसाइज करण्यासाठी बारामतीतील प्रसिद्ध अशा ‘ऑक्सिजन जिममध्ये’ आल्या. खरंतर आठ दिवसांपूर्वीच त्यांनी जिममध्ये प्रवेश नोंदवला होता. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे रीतसर पैसे भरले.
आपली कोणतीही ओळख सांगितली नाही. आज तितक्याशा चित्रपटांमध्ये त्या दिसत नाहीत. कदाचित याच कारणामुळे नवी पिढी त्यांना फारशी ओळखत नाही. परंतु काही लोकांच्या लक्षात लगेच आले आणि त्यांनी ते जिम व्यवस्थापनाच्याही लक्षात आणून दिले.
1980 च्या सुरुवातीलाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. या दशकात आपल्या अभिनयाने चमकलेल्या अभिनेत्री ‘अनिता राज’ त्या काळच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक. धर्मेंद्र, राज बब्बर, विनोद खन्ना अशा अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी चित्रपट केले. राज बब्बर यांच्यासोबत चित्रीत केलेले त्यांचे ‘होटो से छू लो तो मेरा गीत अमर कर दे’ हे गाणं अजरामर झालं.
आज त्यांनी वयाची जवळपास 60 वर्षे पूर्ण केली. परंतू हा अंक केवळ नंबर म्हणूनच पहावा लागेल. आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या आपल्या वयापेक्षा वीस वर्षांनी तरूण वाटतात. सातत्याने केलेला व्यायाम आणि योग्य आहार या जोरावर आजही त्या तितक्याच उत्साही वाटतात. एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून देखील त्यांच्यात कमालीचा विनम्रपणा आहे. मुंबईतीलच जन्म असल्याने त्यांना अस्खलित मराठी बोलता येते.
त्या ‘लता करे’ या बारामतीतील रियल आयडॉल स्टोरीवरती आधारीत हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बारामतीमध्ये आले आहेत. ऑक्सीजन जिममध्ये व्यायाम करणाऱ्या सर्व महिलांना त्यांनी व्यायामाचे चांगलेच धडे दिले. या गुणी अभिनेत्रीचा सत्कार ऑक्सीजन जिमचे प्रमुख प्रेम जाधव यांनी केला. जिम तर्फे आम्ही त्यांना श्री गणेश मुर्ती भेट दिली, तर संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवली, ती बारामतीतील सुप्रसिद्ध सूत्रसंचालन व भाषण कला प्रशिक्षक ज्ञानेश्वर जगताप यांनी.
याप्रसंगी अयुब खान, विकास गायकवाड, श्री. शहा आदी उपस्थित होते. आज अनिता राज यांच्याकडे पाहून वाटलं की, थोड्या प्रसिद्धीनेही आजकालचे ‘रिल स्टार’ जिथे हुरळून जातात. तिथे एवढी कारकीर्द असतानासुद्धा पाय जमिनीवर ठेवून, एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वांशी सलोख्याने वागणाऱ्या अभिनेत्री उगाच ग्रेट बनल्या नाहीत.