मुंबई : महान्यूज लाईव्ह
विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चेनुसार स्पर्धा परीक्षांची भरमसाठ फी आकारली जात आहे, त्यावरून कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. याचं गांभीर्य राज्याच्या तळागाळापर्यंत पोहोचले, तरी देखील सरकारमधील मंत्र्यांना मात्र याचे गांभीर्य समजलेले दिसत नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात उत्तर देताना 1000 रुपये फी चे समर्थन करताना एरव्ही पन्नास-पन्नास हजार रुपयांचे मुलं क्लासेस लावतात, मग 1000 रुपयाची फी द्यायला काय झालं? अशा शब्दात विद्यार्थ्यांचा सिरियसनेस वाढावा म्हणून आम्ही 1000 रुपये फी ठेवली असे उत्तर दिले.
हे उत्तर खरंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच आहे, तोच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सात प्रश्न विचारले आहेत. या सात प्रश्नांची सध्या राज्यात चर्चा आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले हे त्यांची पोस्ट जशीच्या तशी.. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब, सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर seriousness येत असतो ,हे सरकारने देखील seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी serious व्हावे .











