भिगवण : महान्यूज लाईव्ह
भिगवण मधील प्रसिद्ध मासे खानावळीचे मालक विशाल धुमाळ यांच्यावर एका हल्लेखोराने अचानक काल संध्याकाळी धारदार कोयत्याने प्राणघात हल्ला केला, या हल्ल्याने भिगवणमध्ये खळबळ उडाली. या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र विशाल धुमाळ यांना तातडीने बारामतीतील दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेच्या मागे आणि पुढे शेकडो वाहनांची गर्दी काल संध्याकाळी बारामतीकरांनी पाहिली.
विशाल धुमाळ भिगवणमधील प्रसिद्ध मासे हॉटेलचे मालक असून पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल ज्योती व्हेज या हॉटेल समोर काल संध्याकाळी हा प्रकार घडला. अचानक हल्लेखोराने येऊन विशाल धुमाळ यांच्यावर कोयत्याने वार केले. यापैकी एक कोयत्याचा वार त्यांच्या पोटाजवळ लागला आणि विशाल धुमाळ यांना गंभीर जखम झाली.
हा हल्ला होताच परिसरातील सर्व युवक धावत आले आणि त्यांनी विशाल धुमाळ यांना तातडीने दवाखान्यात नेले. दरम्यान याचवेळी भिगवण पोलिसांनीही या ठिकाणी धाव घेतली, हा प्रकार जिथे घडला ती दौंड पोलिसांची हद्द होती, मात्र तातडीने भिगवण पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि विशाल धुमाळ यांना कमीत कमी वेळेत दवाखान्यात पोहोचवण्याची सूचना करत पुढील कार्यवाही केली.
यानंतर विशाल धुमाळ यांच्यावर हल्ला झाल्याची समजतात भिगवणमधून मिळेल त्या वाहनाने युवक बारामतीकडे धावले. धुमाळ यांना बारामती हॉस्पिटलमध्ये तातडीने दवाखान्यात नेण्यात आले होते. या ठिकाणी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान विशाल धुमाळ यांची प्रकृती स्थिर असून पोलीस हल्ल्याचे कारण शोधत आहेत.