काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात डोळ्यांच्या साथ वाढली असून दिवसेंदिवस हे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दौंड तालुक्यात अवघ्या ९ दिवसात तब्बल ५८६ डोळ्यांच्या साथीचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील डोळ्यांच्या साथीचे वाढते रुग्ण हे चिंताजनक बाब असून पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यासह पुणे जिल्ह्यात डोळे येण्याच्या आजाराने थैमान घातले आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही डोळ्यांचा साथीचा रोग झपाट्याने पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दौंड तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अवघ्या ९ दिवसात ५८६ डोळ्यांचे साथीचे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. दिवसाला प्रत्येकी १८ ते २० रुग्ण नव्याने आढळून येत आहेत.
तालुक्यातील देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात जास्त म्हणजे १२७ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ राहू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २०, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८, केडगाव १० अशा प्रमाणात दिवसेंदिवस हे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. दौंड तालुक्यात वाढत चाललेली ही डोळ्याच्या साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत असलेल्या अंगणवाड्या, शाळा व घरोघरी जाऊन आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका या तपासणी करीत आहेत. हे रुग्ण आढळल्यास त्वरित प्राथमिक उपचार करुन दक्षता घेतली जात आहे. शाळेत डोळ्यांच्या साथीचे रुग्ण आढळून आल्यास त्यास शाळेत पाठवू नये असे आवाहनही त्यांच्याकडून केले जात आहे. डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे दुखणे अशी या साथीच्या रोगांची प्राथमिक लक्षणे आहेत.
अशी लक्षणे आढळून आल्यास संबंधित रुग्णांनी व पालकांनी त्वरित जवळील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे. हे साथीचे रोग होऊ नये यासाठी हात व डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत, डोळे जास्त वेळ चोळू नये, अशी लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यापासून लांब राहणे व त्यास शाळेत येऊ न देणे, विशेषता पालकांनी व शिक्षकांनी अधिक दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन ही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, तालुक्यात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डोळ्यांमध्ये सोडण्यासाठी असलेले ड्रॉप व औषधे यांचा तुटवडा असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी आरोग्य रुग्णांची तपासणी करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचेही चित्र आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिक व पालकांकडून होत आहे.