शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील निमोणे गावचे सुपुत्र अभिजित भरत काळे यांनी नाशिक पोलिस अकदामी येथे उल्लेखनीय कामगिरी करत पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी तुकडीत प्रथम क्रमांक पटकावत तुकडीचे नेतृत्व करत संचालन केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल शिरूर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
शिरूर तालुक्यातील निमोणे येथील अभिजित भरत काळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. १ ऑगस्ट २०२२ पासून नाशिक येथे प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले होते. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांनी सहामाही परीक्षेतही प्रथम क्रमांक पटकावला होता, तर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२२ मध्ये ही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत उज्ज्वल यश प्राप्त केले.
नाशिक येथे सत्र क्रमांक १२२ चा दीक्षांत समारंभ पार पडला.या दीक्षांत समारंभात संपूर्ण तुकडीचे परेड कमांडर म्हणून संचालन करण्याचा मान मिळाला.संपूर्ण तुकडीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर व स्व. यशवंतराव चव्हाण बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट चषक देण्यात आले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांसह मान्यवर उपस्थित होते.
अभिजित काळे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, शिरूर तालुक्याला प्रथमच दीक्षांत समारंभात अशा प्रकारे नेतृत्व करण्याचा मान मिळाला असून मेहनतीने व प्रामाणिकपणे केलेले हे यश आहे, तर आई राजश्री व भरत काळे यांनी लेकाचा एवढा मोठा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत होताना डोळ्यात आनंदाश्रू आल्याची प्रतिक्रिया दिली.