राजेंद्र झेंडे, दिल्ली
दिल्ली : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आहे त्या धरणासाठ्यामधील उपलब्ध होणारा पाणीसाठा पुणे शहराला पुरत नाही, परिणामी भविष्यात दौंड ,बारामती आणि इंदापूरला शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात भेडवणार आहे याचीच मला चिंता असल्याची खंत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा दिल्ली येथे आयोजित केला होता. यावेळी दौंड च्या पत्रकारांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी मनसोक्त गप्पा मारीत तालुक्यातील राजकीय , सामाजिक, शैक्षणिक अशा विविध घडामोडीविषयी चर्चा केली.
याप्रसंगी बोलताना त्यांनी दौंड , इंदापूर आणि बारामती तालुक्यातील पाणी प्रश्नावर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, सध्या पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. खडकवासला धरणातून उपलब्ध होणारा पाणीसाठा हा जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी म्हणजेच दौंड, इंदापूर ,बारामती तालुक्यासाठी शेती आणि पिण्यासाठी देण्यात येत आहे. मात्र पाणीही जीवनावश्यक असल्याने ते सर्वांसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
या दृष्टिकोनातून पुणे शहराला मी मुख्यमंत्री असताना खडकवासला धरणातून उपलब्ध पाणीसाठ्यातून काही प्रमाणात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. मात्र सध्या पुणे शहराला दौंड, बारामती व इंदापूर या तालुक्याला पाणीसाठा कमी करून जादा पाणीसाठा दिले जात आहे. तरीही हा पाणीसाठा पुणे शहरासाठी कमी पडत आहे.
हे जर असेच सुरू राहिले तर दौंड इंदापूर आणि बारामती तालुक्याला भविष्यात पाण्याचा थेंबही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी मुख्यमंत्री असताना मावळ प्रांतात दोन धरणे बांधली. त्यामुळे बऱ्यापैकी पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत झाली. ग्रामीण भागात शहरीकरण आणि औद्योगीकरण ही झपाट्याने वाढत आहे. त्यातच दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील अनेक गावी दुष्काळी आहेत.
पुणे शहरासाठी पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यात शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार आहे.अशी चिंता शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, कात्रज दुध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सचिन काळभोर, अजित शितोळे, सचिन भिसे आणि दौंड तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.