मुंबई – महान्यूज लाईव्ह
राज्यात ज्या कारणावरून शिंदे गटाने शिवसेना उध्दव ठाकरे गटापासून फारकत घेतली, त्याच अजित पवारांनी अर्थ खाते ताब्यात घेताच निधींची खैरात आमदारांवर केली आहे, अर्थात एकाच पक्षाच्या आमदारांना निधी दिलेला नाही, तर सर्वच आमदारांना त्यांनी निधी दिलाय, मात्र निधी आपल्या मतदारसंघात नेण्यात पहिल्या तीन क्रमांकात भाजपचे प्रशांत बंब, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व तिसऱ्या क्रमांकावर इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे आहेत.
इंदापूर तालुक्यात फक्त सत्ता येऊ द्या, मी काय आणतो ते पहाच असे म्हणणाऱ्या भरणेंनी आताही फक्त सत्ता येऊन काहीच दिवस उलटलेत, अजून महिनाही झालेला नाही, तोच पाचशे कोटींची मजल मारली आहे. भरणेंनी १ हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी अधिवेशन संपेपर्यंत मिळवला, तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना भरणे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्यात आणला. हजारो कोटींची रस्त्यांची कामे त्यांनी करून घेतली. राष्ट्रीय महामार्गाबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचेही मजबूत जाळे विणण्यासाठी त्यांनी मोठा निधी आणला, ज्याची अजूनही राज्यातील इतर आमदार चर्चा करीत आहेत.