अनिल गवळी- महान्यूज लाईव्ह
पुण्यात कोंढवा भागात दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सापडले, अगदी सहजासहजी त्यांना भाडेकरू म्हणून मालकाने घर दिले होते, ही बाब लक्षात येताच पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. भाडेकरार न करता, सर्व माहिती न घेता घर भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाल्यास घरमालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
हे दोघे दीड वर्षांपासून पुण्यात राहत असतानाही पोलिसांना त्याचा थांगपत्ता नव्हता. या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी घरमालकाने भाडेकरूची माहिती नजिकच्या पोलिस ठाण्यात सादर करणे सक्तीचे केले आहे. जिथे सोसायट्या असतील, तिथेही सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना भाडेकरूचे व्हेरिफिकेशन करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे व्हेरीफिकेशन होत नाही, तोवर भाडेकरूला प्रवेश देऊ नये, अन्यथा काही विपरित घडून आल्यास अशा सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांवरही कारवाई होऊ शकते अशा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र रेंट अॅक्ट 1999 मधील कलम 24 अन्वये प्रत्येक घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशन येथे देणे हे बंधनकारक आहे. जर ती दिली नाही, तर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूची माहिती ज्याप्रमाणे स्वतःकडे घेतली जाते, तशीच ती माहिती पोलिस ठाण्यातही द्यावी.