बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील तपोवन कॉलनीतील अमोल श्रीकृष्ण साळुंखे यांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील मुंगेरीगंज येथील मिनीकुमारी रविशंकर सिंग व चेतन पल्लव या दोघांवर वीस लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बारामतीतील तपोवन कॉलनी येथे मूळ राहणारे अमोल श्रीकृष्ण साळुंखे हे सध्या दक्षिण कोरिया मध्ये शिक्षण घेत आहेत. तेथील विविध जर्नल मध्ये पब्लिकेशन करावयाचे आहे असे सांगून बिहारमधील या दोघांनी साळुंखे यांची वीस लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 यादरम्यान हा गुन्हा घडलेला आहे. अमोल साळुंखे यांनी मिनीकुमारी व चेतन पल्लव या दोघांना वेळोवेळी त्यांच्या बारामतीतील एचडीएफसी व महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून वीस लाख पाच हजार रुपयांची रक्कम पाठवली.
ही रक्कम युरेशियन केमिकल कम्युनिकेशन जर्नल, सॉलिड टेस्ट फीना फिनालेना जर्नल, जर्नल व वर्ड अकॅडमी सायन्स जर्नल व नवीन जर्नल घेण्यासाठी या बंटी बबली ने मागितली होती. एवढे पैसे भरून देखील मिनीकुमारी व चेतन पल्लव या दोघांनी कोणत्याही जर्नल मध्ये पब्लिकेशन न देता अमोल साळुंखे यांचा विश्वासघात करून संगनमताने फसवणूक केली आहे. याप्रकरणी साळुंखे यांनी फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.