दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील तलाठी भरतीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर आता महा-ई-सेवा केंद्रांच्या सर्व्हरने पाणी फिरवले आहे. 17 जुलै ही अर्ज भरण्यासाठी जी शेवटची अंतिम मुदत देण्यात आली होती, त्या मुदतीत सर्वर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेले नाहीत .त्यामुळे हजारो विद्यार्थी या भरती पासून वंचित राहिले आहेत.
तालुक्यातील हजारो बेरोजगार विद्यार्थी राज्य सरकारने काढलेल्या तलाठी भरतीसाठी आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी वाईच्या सेतू कार्यालयात हेलपाटे मारताना दिसत होते, पण तेथील सर्व्हरवर अतिरिक्त ताण आल्याने ते धिम्या गतीने चालत असल्यामुळे अनेकांना आवश्यक महत्त्वाचे दाखले मिळू शकले नाहीत.
काही विद्यार्थ्यांना ते उपलब्ध झाले, पण दुर्दैवाने सर्व कागदपत्र हातात घेऊन महा ई सेवा केंद्रात फार्म भरण्यासाठी शेकडो विद्यार्थी पोहचले, पण तेथील महा ई सेवा केंद्र चालकांनी सांगितले की, शासनाने तलाठी भरती १७ जुलै हि शेवटची तारीख जाहीर केली आहे .पण आज सकाळ पासूनच शासनाने ठरवून दिलेल्या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन असल्याकारणाने एकही फार्म भरला गेला नाही .
असे उत्तर विद्यार्थ्यांनी ऐकल्यानंतर विद्यार्थी नाराज झाले, अर्थात तरी देखील विद्यार्थी हे भर पावसात हे संकेतस्थळ चालू होईल अशा आशेवर दिवसभर ताटकळत बसले, पण संध्याकाळपर्यंत ते चालूच झाले नसल्याने वाई तालुक्यातील शेकडो विद्यार्थी हे या तलाठी भरतीपासून वंचित राहील्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्य शासनाने या गलथान कारभाराची गंभीर दखल घेऊन ज्या एजन्सीला या वेबसाईट साठी नेमले आहे, त्यांच्यावर कडक करवाई करुन फार्म भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी तलाठी भरती मधील विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली आहे.