इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथे मागील महिन्यात 26 व 28 जून रोजी तीन दिवसांमध्ये लागोपाठ पत्नी व पतीने आत्महत्या केली. या घटनेने लुमेवाडी हादरून गेले होते, मात्र ही घटना म्हणजे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला त्रास, ओढून नेलेली गाडी आणि त्यामुळे समाजात बिघडलेली पत याच कारणामुळे झाली असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल होताच, पोलिसांनी टाटा फायनान्स कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
टाटा मोटर्स फायनान्स लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गाडी ओढून नेल्याने लुमेवाडी येथील सुलभा संतोष माने (वय ४० वर्ष) आणि संतोष महादेव माने (वय ४५ वर्ष) या दोघांनी आत्महत्या केली होती या घटनेवरून वसंत आप्पा माने यांनी 15 जुलै रोजी इंदापूर पोलिसांकडे फिरण्यात दिली त्यावरून पोलिसांनी भादवि कलम 306 अंतर्गत बाळासाहेब पाटोळे व फायनान्स कंपनीच्या इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील थोडक्यात माहिती अशी संतोष माने यांनी टाटा जेस्ट एमएच ४२ ए क्यू 99 45 ही चार चाकी गाडी टाटा मोटर्स फायनान्स कडून हप्त्याने घेतली होती. मात्र हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या या कर्मचाऱ्यांनी 26 जून रोजी ही चारचाकी गाडी ओढून नेली.
या दरम्यान सुलभा माने यांना फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून शिवीगाळ केली होती. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या सुलभा माने यांनी २६ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुलभा माने यांच्या आत्महत्येला तिसरा दिवसही उजाडत नाही, तोच त्यांच्या पतीने देखील नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन 28 जून रोजी राहत्या घरीच आत्महत्या केली. दरम्यान संतोष माने यांची आत्महत्या म्हणजे फायनान्स कर्मचाऱ्यांनी घडवून आणलेल्या प्रकारामुळे झाली असल्याचा आरोप फिर्यादी वसंता आप्पा माने यांनी केला.
संतोष माने आपल्याशी बोलले होते त्यांनी बाजारातली आपली पत गेली, परिसरात माझी अब्रू गेली, पत्नीही गेली, हे सगळं फायनान्स कंपनीमुळे घडलं असे नैराश्यातून म्हटले होते असे वसंत माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून बावडा पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या तीन जणांविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे इतर तिघे कोण याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून, या घटनेच्या अन्य बाजू, एकूण पार्श्वभूमी, सत्य आणि तथ्य आपण तपासत असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी म्हटले आहे.