परिविक्षाधीन आयपीएस कमलेश मीना यांची धडक कामगिरी
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक महिन्यांपासून वाई शहरातून दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ही टोळी पकडण्याचे आदेश वाई पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी कमलेश मीना यांनी दिले होते. त्यामुळे सहायक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, विजय शिर्के, श्रावण राठोड, राहुल भोईर, प्रेमजीत शिर्के यांचे पथक तयार केले व तपास सुरू केला.
या पथकाने आदेशाचे पालन करत तपास गतीमान करण्यासाठी संपर्कातील खबऱ्यांची माहिती काढण्यासाठी व पथकाने तांत्रिक बुध्दीचा वापर करत पुणे येथील वारजे परिसरात सापळा लावला. त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलासह दोन भावंडे पोलिसांच्या ताब्यात आली त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी तब्बल दहा दुचाक्या चोरल्याची कबूली दिली. यातील पाच दुचाक्या बारामती सोमेश्वरनगर येथील मित्रांना वापरण्यास दिल्याचे सांगितले.
या पथकाने आरोपीसह सोमेश्वरनगर गाठले व तेथून पाच दुचाक्या ताब्यात घेवुन पथकाने वाई गाठली.
तेथील अल्पवयीन आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी पाच दुचाक्या ताब्यात घेतल्या. तीन आरोपींकडून अडीच लाख रुपये किमतीच्या तब्बल १० मोटरसायकली ताब्यात घेण्यास या पोलिस पथकास यश आल्याने चोरी गेलेल्या मोटरसायकलींच्या मालकांसह वाईकर नागरीकांनी आयपीएस कमलेश मीना आणि पोलिस पथकाला समक्ष भेटून अभिनंदन केले.