सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी शेजारच्या कचरवाडी गावातील महादेव बरळ यांनी अडीच एकर जांभळाची बाग बारा वर्षांपूर्वी लावली. गेल्या वर्षीपर्यंत पुण्या मुंबईला विक्री होणारी त्यांची जांभळं यावर्षी त्यांच्या बीएससी ऍग्री झालेल्या मुलांच्या पुढाकारामुळे चक्क ॲमेझॉन आणि बिग बास्केट वरून ऑनलाईन द्वारे विक्री होत आहेत तब्बल 220 ते 280 रुपये प्रति किलो दर त्यांना मिळत असून, पुणे आणि मुंबईतील बाजारातील दर 70 ते 140 रुपये पर्यंत मिळत आहे. या वेगळ्या शोधलेल्या बाजारपेठेमुळे आपल्याला अच्छे दिन आल्याचे बरळ कुटुंबियांनी सांगितले.
पिकते ते विकण्यापेक्षा विकते ते पिकवण्याकडे शेतकऱ्यांचा कल मधला काळात वाढला. आता जे विकते आहे, ते अधिकाधिक दराने कसे विकले जाईल आणि त्यासाठीच्या विक्रीच्या नव्या पद्धती कशा शोधता येतील, यावर आता शेतकरी भर देऊ लागले आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे अविनाश आणि अमर बरळ या बीएससी ऍग्री झालेल्या बळीराजाच्या मुलांच्या धोरणात्मक दूरदृष्टीतून आलेली ऑनलाईन विक्रीचा नवा पर्याय मानावा लागेल.
जांभूळ हे तसे पाहिले गेल्यास नाशवंत मालापैकी एक आहे. शेतमाल जेवढा नाशिवंत, तेवढा तो जास्तीत जास्त काळ टिकत नाही आणि त्याची विक्री देखील लवकरात लवकर करावी लागते. मात्र अशा स्थितीत देखील जांभळासारख्या फळांची ऑनलाईन विक्री करून बरळ कुटुंबीयांनी एक मोठे उदाहरण शेतकऱ्यांपुढे घालून दिले आहे.
बरळ कुटुंबीयांची कचरवाडी मध्ये 17 एकर शेती आहे. या शेतामध्ये त्यांनी सर्व फळबागाच घेतल्या आहेत . यामध्ये पेरू, शेवगा, जांभूळ, वॉटरएप्पल, फॅशन फ्रुट, डाळिंब आदी वेगवेगळ्या बागांचा समावेश आहे. तेरा वर्षांपूर्वी बागेत जांभळाची झाडे आणली.
ही झाडे त्यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर यांच्या मार्गदर्शनातून आणली आणि लावली. कोकण बहाडवी नावाची ही जात त्यांनी लावली असून गेली बारा वर्षे त्याचे उत्पादन घेत आहेत. या वर्षी आतापर्यंत सहा टन जांभळाची विक्री त्यांनी केली, असून त्यापैकी दोन टन जांभूळ हे चक्क अमेझॉन आणि बिग बास्केट च्या ऑनलाईन विकली आहेत.
अविनाश व अमर बरळ यांनी सांगितले की, ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉन च्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली. ॲमेझॉन वर किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे. तर पुणे आणि मुंबई येथील नेहमीच्या पारंपारिक बाजारपेठेत याच जांभळाचा दर 70 रुपये ते 140 रुपये प्रति किलो यादरम्यान आहे ऑनलाइन विक्री यावर्षी केल्यामुळे आम्हाला दुप्पट उत्पन्न मिळाल्याचे या दोघा बंधूंनी सांगितले.
अडीच एकर जांभळाच्या बागेत आतापर्यंत अकरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असा अंदाज महादेव बरळ व शुभांगी बरळ यांनी व्यक्त केला असून, सकाळी सात वाजल्यापासून या जांभळाच्या तोडणीला सुरुवात होते. दुपारी दोन पर्यंत जांभळाची तोडणी करून त्यानंतर प्रतवारी करून जांभळाचे पॅकिंग केले जाते. यातील ॲमेझॉन साठी विक्री करता आवश्यक असलेली जांभळाचे पनेट टेंभुर्णी येथे नेऊन द्यावे लागतात, तर बिग बास्केट चे कार्यालय गावातच असल्यामुळे तिथेच आम्ही हे जांभूळ पुरवतो आणि उरलेली सर्व जांभळे पुणे व मुंबई मार्केटला जातात असे बरळ कुटुंबीयांनी सांगितले.