बारामती : महान्यूज लाईव्ह
आसपासच्या भागात आता कोणाच्याही लहान मुलांच्या घशात काही अडकलं की सगळेजण धाव घेतात ते डॉक्टर मुथांकडे डॉक्टर राजेंद्र मुथा आणि डॉक्टर सौरभ मुथा अशा किचकट गोष्टींसाठी आता अजून देवदूत ठरले आहेत आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला.
बारामतीतील प्रतिथयश वकील अभिजीत खटावकर यांच्या चार वर्षाच्या मुलाने घरात खेळता खेळता अचानक सोन्याची छोटीशी अंगठी गिळली . त्याने काहीतरी गिळले आहे असे दिसून येताच साऱ्यांची घाबरगुंडी उडाली. त्याला त्रास होऊ लागताच त्याला तातडीने डॉक्टर मुथांच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
डॉक्टर मुथा यांनी क्ष किरण तपासणी केली, तेव्हा त्याच्या घशातील अन्ननलिका आणि श्वासनलिकेच्या मध्ये ही सोन्याची अंगठी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी वेळ न दवडता त्याची शस्त्रक्रिया केली.
भुलतज्ञ अमर पवार, डॉ. सौरभ निंबाळकर,डॉ सौरभ मुथा यांनी डॉक्टर राजेंद्र मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पाडली. अशा घटनेमध्ये वेळ दवडणे अतिशय धोकादायक असते, त्यामुळेच वेळेत ही शस्त्रक्रिया पार पडल्याने ही सोन्याची अंगठी बाहेर निघाली आणि रुद्रच्या जीवावरचा धोका टळला. या घटनेनंतर बारामतीचे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड उमेश काळे, माजी अध्यक्ष ॲड ज्ञानदेव रासकर, ॲड खटावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर मुथा यांचा सत्कार केला